…म्हणून शिवसेना भाजपच्या युतीने काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीही खुश

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – आगामी लोकसभा निवडणूक जवळ येईल तसे, राजकीय पटलावर निवडणुकांचे वारे वाहू लागले आहे. कोण कोणाबरोबर युती करणार कोण कोणत्या पक्षात जाणार या चर्चेला उधाण आले आहे. तसेच राज्यात भाजप आणि शिवसेनेची युती होणे हे विरोधी पक्षाच्या पथ्यावर पडणार आहे. सत्तेत असूनही शिवसेना सरकारवर टीका करत होती, त्यामुळे विरोधकांची जागाही शिवसेनेने व्यापली होती. आता मात्र युती झाल्याने शिवसेनेमुळे विरोधकांचे होणारे मतविभाजन टाळले जाईल, अशी अशा काँग्रेस आणि राष्ट्रवादीला वाटत आहे.

केंद्र आणि राज्यात शिवसेना सत्तेत सहभागी असूनही भाजप आणि शिवसेनेचा नेहमीच 36 चा आकडा राहिला आहे. सत्तेत मंत्री असूनही केंद्राच्या आणि राज्य सरकारच्या अनेक धोरणांवर कधी जाहीर भाषणांमधून तर कधी ‘सामना’मधून टीका होतच राहिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असोत किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी, शिवसेनेने खालच्या थरावर जाऊन या दोघांवर टीका केली. लोकसभा असो की विधानसभा दोन्हीकडे सरकारच्या धोरणावर शिवसेनेचे खासदार आणि आमदार तुटून पडायचे. मात्र विरोधी पक्ष काँग्रेस, राष्ट्रवादी आहे की शिवसेना असे वातावरण या चार वर्षात अनुभवायला मिळाले आहे.

युती झाल्याने विरोधी पक्षासाठी मात्र एक गोष्ट अशी झाली की, भाजप सरकार विरोधातील जी मते शिवसेना घेऊ शकत होती, त्या मतांचे विभाजन आता टाळले जाईल. शिवसेनेला मत म्हणजे मोदींना मत हे आता स्पष्ट झाल्याने विरोधी पक्षांना राज्यात जागा मोकळी झाली आहे. सरकार विरोधातील रोष पाहता युतीसाठी भाजपने बरेच प्रयत्न केले आहेत. एकीकडे देशात मोदी विरोधकांची मोट बांधली जात असताना भाजपला आपल्या मित्रपक्षाला युती टिकवण्यासाठी मेहनत करावी लागली. गेल्या चार वर्षात भाजप आणि शिवसेना समर्थांकामध्ये टोकाचे वाद झाले आहेत. मात्र युती झाली तरी या समर्थकांनी एकत्र येऊन एकत्र काम करणे, आणि एकमेकांची मते युतीच्या उमेदवारांना मिळवून देणे हे आव्हान दोन्ही पक्षांसमोर आहे.