विरोधात बसलेले काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेते सत्तेची फळं ‘चाखणार’ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – विधानसभा निवडणूक युती करून लढलेल्या शिवसेना-भाजपला जनतेने बहुमत दिले होते. यामध्ये भाजपने 105 तर शिवसेनेला 56 जागा मिळाल्या. त्यामुळे राज्यात युतीचे सरकार येणार हे जवळपास निश्चित झाले होते. मात्र, शिवसेना मुख्यमंत्रीपदावर आडून बसली आणि भाजपने नरमाईची भूमिका न घेतल्याने युती तुटली. शिवसेनेने राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या मदतीने राज्यात सत्ता मिळवली आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले.

राज्यात युती तुटल्यानंतर याचे परिणाम स्थानिक संस्थामध्ये असलेल्या युतीवर झाले. शिवसेना-भाजपने जिल्हा परिषदा, नगरपालिका, महापालिका, पंचायत समितींमध्ये युती करून एकत्र लढले. मात्र, आता राज्यातील दोन्ही पक्षांची युती तुटल्याने याचा परिणाम स्थानिक पातळीवर होताना दिसून येत आहे. स्थानिक संस्थामध्ये विरोधात बसलेले राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे नेते आता महाविकास आघाडीमुळे पुन्हा सत्तेत येऊन सत्तेची फळं चाखणार आहेत. तर सत्तेत असलेल्या भाजपला मात्र विरोधात बसण्याची वेळ आली आहे.

महाराष्ट्रात युती तुटल्यानंतर शिवसेनेला दोन नवीन मित्र मिळाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेना या तीन पक्षांची आघाडी झाल्याने राज्यातील समिकरणं बदलली आहेत. विरोधातील नेते सत्तेत आले आहेत तर सत्तेतील विरोधात गेले आहेत. मागील तीस वर्षापासून युतीत एकत्र लढलेले शिवसेना-भाजप यांच्यातील युती तुटल्याने आगामी काळात होणाऱ्या स्थानिक निवडणुकांमध्ये हे दोन पक्ष एकमेकांच्या विरोधात लढणार आहेत.

महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर त्यांनी कामाचा धडका सुरु केला असून भाजपने घेतलेले निर्णय रद्द करण्यात येत आहेत. भाजप सरकारच्या काळात विकास कामांना देण्यात आलेल्या निधीची चौकशी ठाकरे सरकारने करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवरील नेत्यांमध्ये नाराजी असून राज्यात सत्तेत नाही तर स्थानिक पातळीवर एकत्र का लढायचे ? असा सूर या नेत्यांमधून निघत आहे. त्यामुळे आगामी काळात कधीकाळी मित्र पक्ष असलेल्या दोन पक्ष आगामी काळातील निवडणुकीत एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना दिसणार असल्याचे चित्र पहायला मिळत आहे.

फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/policenama/