महाआघाडीचा फॉर्मुला ; दोन्ही काँग्रेस मित्र पक्षांना सोडणार ८ जागा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने महाआघाडीचा फॉर्मुला ठरला असून काँग्रेस आणि राष्ट्रवादी महाराष्ट्रातील त्यांच्या मित्र पक्षांना आठ जागा सोडणार आहेत अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी प्रत्येकी ४-४ जागा आपल्या कोठ्यातून सोडणार आहेत. तसेच मित्र पक्षांनी महाआघाडीची साथ सोडल्यास काँग्रेस २६ आणि राष्ट्रवादी २२ जागी लढण्याच्या तयारीत आहेत.

हे ही वाचा – भाजपच्या ताठरतेने ‘युती’चा व्हॅलेंटाईन हुकणार 

प्रकाश आंबेडकर यांच्या भारिप बहुजन महासंघाला चार जागा देण्याच्या तयारीत महाआघाडी असून प्रकाश आंबेडकर आपल्या बारा जागांच्या मागणीवर ठाम आहेत. स्वाभिमानी, माकप, हितेंद्र ठाकूर यांचा बहुजन विकास आघाडी आणि रिपाइं कवाडे किंवा गवई गटाला प्रत्येकी एक जागा देण्याच्या तयारीत महाआघाडी आहे.

राज ठाकरे यांच्याशी अजित पवार यांनी काल रात्री भेट घेतल्याने मनसेच्या महाआघाडीत येण्याच्या शक्यतेला जोर मिळत आहे. असे झाल्यास राज ठाकरे यांना हि किमान एक अथवा दोन जागा द्याव्या लागणार आहेत. या कोणाच्या कोठ्यातून दिल्या जाणार हा देखील मुख्य प्रश्न आहे यावर सध्या महाआघाडीत मंथन सुरु आहे.

अहमदनगरच्या लोकसभा जागेवरून काँग्रेस आघाडीत विस्तव कायम असून विरोधी पक्ष नेते राधा कृष्ण विखे पाटील यांच्या पुत्राला अहमदनगर मधून निवडणूक लढवायची आहे. तर आघाडीत अहमदनगर आणि औरंगाबादच्या जागेवरून अद्याप एकमत झाले नाही.