इंदापूर विधानसभेसाठी हर्षवर्धन पाटील की दत्‍तात्रय भरणे ? कोणाचं तिकीट फायनल ?

इंदापूर : पोलीसनामा ऑनलाइन – राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांची विधानसभेसाठी आघाडी झाल्यास इंदापूर विधानसभेची जागा कोणाकडे जाणार याची नेहमीच चर्चा होत आली आहे. कारण दोन दिग्गज नेते या जागेवर हक्क सांगत आहेत. गेल्या विधानसभेला राष्ट्रवादी काँग्रेसच्या दत्तात्रय भरणे यांनी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचा या मतदारसंघातून पराभव केला. हर्षवर्धन पाटील आणि दत्तात्रय भरणे या दोन्ही नेत्यात या जागेसाठी नेहमीच स्पर्धा पहायला मिळत आहे. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी देखील ही जागा प्रतिष्ठेची केली आहे.

अशा परिस्थिती आता हे दोन्ही नेते एकाच व्यासपीठावर दिसून आल्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. इंदापूर शहरातील अलंकार परिवाराच्या एस. एस. मोबाईल शॉपच्या उदघाटनानिमित्त हे दोन्ही नेते एकत्र दिसून आले. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आघाडी झाल्यास इंदापूर विधानसभेची जागा विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे पुन्हा लढवणार की हर्षवर्धन पाटील लढवणार याची चांगलीच चर्चा रंगली आहे.

हर्षवर्धन पाटील यांनी कॉग्रेस सोडुन काही वर्ष अपक्ष निवडणुक लढविली व प्रत्येक वेळी वेग़वेगळ्या पक्षाच्या सरकार मध्ये मंत्री पद पटकावले. त्या नंतर त्यानी कॉग्रेसच्या सरकारमध्ये मंत्री पदावर असतानाच कॉग्रेसचे काम पाहण्यास सुरुवात केली व निवडणुक काळात कॉग्रेस मध्ये प्रवेश करून कॉग्रेस च्या वतिने निवडणुक लढविली. हर्षवर्धन पाटील १९९५, १९९९, २००४ ला अपक्ष म्हणून विधानसभेवर निवडून गेले आणि २००९ साली ते काँग्रेसकडून विधानसभेवर निवडून गेले. आघाडी सरकारमध्ये त्यांनी मंत्री म्हणूनही काम पाहिले. २०१४ ला झालेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या दत्तात्रय भरणे यांनी हर्षवर्धन पाटील यांचा पराभव केला. धनगर समाजाचे नेते म्हणून दत्तात्रय भरणे यांची ओळख आहे. त्यांचीही या मतदारसंघात चांगलीच ताकद आहे.

लोकसभा निवडणुकीत मिळालेले मताधिक्य कोणामुळे ?

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार सुप्रिया सुळे यांना इंदापूर तालुक्यातून चांगले मताधिक्य मिळवून देण्यात आघाडी यशस्वी ठरली असली तरी हे मताधिक्य राष्ट्रवादी काँग्रेसचे का काँग्रेसचे यावरुन तालुक्यात कायमच मतभेद होत आले आहेत. अशातच आगामी विधानसभा निवडणुकीच्यादृष्टीने पाटील आणि भरणे एकत्र येणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

अजित पवार विरुद्ध हर्षवर्धन पाटील

गेल्या विधानसभा निवडणुकीत ही जागा कसल्याही परिस्थितीत निवडून आण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी चांगलेच प्रयत्न केले. अजित पवार यांचे कट्टर विरोधक म्हणून हर्षवर्धन पाटील यांना ओळखले जाते. या दोघांचे राजकारणातील विळा- भोपळ्याचे वैर सर्व महाराष्ट्राला माहित आहे. त्यामुळे आघाडीच्या जागावाटपात इंदापूरची जागा कोणाला जाणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले आहे. इंदापूरची जागा अजित पवार यांनी प्रतिष्ठेची केली आहे . तर माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याशी जवळीक साधत या जागेवर काँग्रेसच्या वतीने दावा केला आहे.

हर्षवर्धन पाटील की दत्तात्रय भरणे

सध्या भरणे आणि पाटील हे तालुक्याच्या विविध कार्यक्रमात एकत्र येताना पाहायला मिळत असले तरी या दोघांचे कार्यकर्ते मात्र आम्हीच इंदापूरची जागा लढविणार यावर ठाम आहेत. त्यामुळे राज्यात जरी काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे आघाडी झाली तरी इंदापूरच्या जागेत बिघाडी होण्याची शक्यता आहे. या सर्व बाबींवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार कसा मार्ग काढणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

आरोग्य विषयक वृत्त

माझ्या मानसिक आजाराने खूप काही शिकवलं- दीपिकाने केला खुलासा

गोडपदार्थ खाताना ‘ही’ काळजी घ्या आणि दातदुखीच्या समस्या टाळा

जाणून घ्या का येतो ‘विसराळूपणा’

रक्ताची गाठही ठरू शकते मृत्यूचे कारण ; वेळीच व्हा सावध