काँग्रेस पक्षातर्फे 30 लाखांचे वैद्यकीय साहित्य महापालिकेला भेट

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना संसर्गजन्य रोगाशी सामना करणारे डॉक्टर्स, नर्सेस, त्यांचा स्टाफ, पोलीस कर्मचारी यांच्या मदतीसाठी कॉंग्रेस पक्षाचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी गेले अडीच महिने पुण्यात कार्यरत आहेत. त्याच मदतकार्यात आमदार शरद रणपिसे यांनी आमदार निधीतून तीस लाखाचे वैद्यकीय साहित्य महापालिकेला भेट दिले.

महापालिका भवनात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस, माजी आमदार मोहन जोशी यांच्या हस्ते आयुक्त शेखर गायकवाड यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. यामध्ये १२९०पीपीई किट, ५८ इन्फ्रारेड थर्मामीटर, ७५०० व्हायरल ट्रान्स्पोर्ट मिडीयम आदी साहित्याचा समावेश आहे.

कोरोना विरोधात लढणाऱ्या प्रत्येक घटकाला उपयुक्त ठरेल अशी मदत कॉंग्रेस पक्षाच्या नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी केली आहे.आमदार शरद रणपिसे यांनी वैद्यकीय साहित्य आमदार निधीतून दिले, आमदार अनंतराव गाडगीळ यांनी पुणे आणि खडकी कॅन्टोन्मेन्टच्या रुग्णालयाला तसेच पुणे महापालिकेच्या रुग्णालयांसाठी वैद्यकीय उपकरणे दिली.लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांनी अन्नदान, मोबाईल क्लिनिकद्वारे पहिल्या टप्प्यातील मोहिमेत सतरा हजाराहून अधिक नागरिकांची मोफत वैद्यकीय तपासणी आणि मोफत औषधोपचार केले, स्थलांतरित परप्रांतीय मजुरांसाठी रेल्वे गाडीची आणि प्रवासातील जेवणाची व्यवस्था, हजारो गरजू कुटुंबियांना महिनाभर पुरेल असे धान्याचे किट, पुण्यात अडकून पडलेल्या विद्यार्थ्यांसाठी भोजन व्यवस्था अशा स्वरूपात गेले अडीच महिने सातत्याने मदतकार्य चालू ठेवून कोरोनाविरोधी लढाईला बळ दिले आहे, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस, माजी आमदार मोहन जोशी यांनी यावेळी बोलताना सांगितले.

काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा श्रीमती सोनियाजी गांधी, पक्षाचे नेते खासदार राहुल गांधी, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिलेले सर्व कार्यक्रम काँग्रेसचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांनी पुण्यात राबविले आहेत, त्यानुसार मदतकार्य पुढेही चालू राहिल, असे मोहन जोशी यांनी सांगितले.