जिल्ह्यातून ‘पंजा’ गायब होऊ देणार नाही, काँग्रेस कार्यकर्त्यांचा निर्धार

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन
पुणे लोकसभा मतदारसंघ आम्हालाच मिळावा असा दावा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केला आहे आणि तो रेटून नेण्याचा त्यांचा प्रयत्न चालू आहे. परंतु, अचानकपणे दोन पक्षातील वादाला भावनिक आणि अस्मितेचे वळण मिळाल्याने काँग्रेस कार्यकर्ते पुण्याची जागा आपल्याच पक्षाकडे राहाण्यासाठी एकजुटीने उभे राहिल्याचे चित्र आता दिसू लागले आहे.

पुणे जिल्ह्यामध्ये लोकसभेचे चार मतदारसंघ आहेत. त्यामध्ये पुणे शहर, बारामती, शिरूर आणि मावळ मतदारसंघांचा समावेश होतो. २०१४च्या लोकसभा निवडणुकीत पुणे शहर वगळता अन्य तीन मतदार संघांमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार होते. राष्ट्रवादी काँग्रेसला आता २०१९मध्ये लोकसभेसाठी पुणे शहर मतदारसंघही हवा आहे आणि असे घडले तर संपूर्ण पुणे जिल्ह्यात काँग्रेसचे पंजा या चिन्हाचे नामोनिशाण राहणार नाही. ही वस्तुस्थिती लक्षात आल्यावर पुणे शहरातील सर्व कार्यकर्ते गट-तट सोडून पुणे शहर लोकसभा मतदारसंघ आपल्याच पक्षाला मिळावा यासाठी एकसंध होऊ लागले आहेत.

काँग्रेस पक्षाचे शहर प्रवक्ते रमेश अय्यर यांनी पंजाच्या अस्तित्वाचा मुद्दा पहिल्यांदा उपस्थित केला आणि त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला. याविषयी बोलताना अय्यर म्हणाले, मी कार्यकर्त्यांच्या मनातील भावना बोलून दाखविल्या. त्यानंतर मला, माझ्या विधानाला पाठिंबा दर्शविणारे पक्षाच्या कार्यकर्त्यांचे अनेक फोन आले. पक्षाच्या नेत्यांनीही मला अनुकूलता दाखवली. हा मुद्दा पक्षाच्या दृष्टीने भावनिक झाला.

विदर्भातील गोंदिया मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसला दिलेला असल्याने पुणे शहराची जागा काँग्रेसकडे राहील असा धूसर विश्वास निर्माण झाला होता मात्र, आता अय्यर यांच्या विधानामुळे त्या विश्वासाला भावनिक बळकटी मिळाली आहे.