राहुल गांधींच्या ‘दर्द’चा ‘इम्पॅक्ट’, काँग्रेसच्या १० ‘डझन’ पदाधिकार्‍यांचा राजीनामा !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. पराभवाचा निकाल येऊन महिना उलटून गेला तरी काँग्रेस अजून जागरूक झाल्याचे दिसून येत नाही. राहुल गांधी यांनी काँग्रेस कार्यकारिणी समोर अध्यक्षपदाचा राजीनामा सादर केला. नुकतेच त्यांनी दुःख व्यक्त करून सांगितले होते की माझ्या राजीनाम्यानंतर कोणत्याही मुख्यमंत्री, महासचिव, प्रदेश अध्यक्ष यांनी पराभवाची जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिला नाही. त्यांनी अशाप्रकारे मनातील वेदना बोलून दाखवल्यानंतर काँग्रेसमध्ये राजीनाम्याची लाट आली आहे. पक्षातील जवळपास १२० महत्वाच्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत.

लोकसभा निवडणुकीत झालेल्या काँग्रेसच्या दारुण पराभवाची जबाबदारी स्वीकारत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी राजीनामा दिला. त्यांची समजूत देखील काढण्यात आली पण राहुल गांधी राजीनाम्यावर ठाम राहिले. परंतु आता पक्षाचे पदाधिकारी सुद्धा राजीनामे देत आहेत. एका पत्रावर काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी सह्या करून राजीनामे दिले आहेत. या पत्रावर आतापर्यंत १२० पदाधिकाऱ्यांनी सह्या केल्या आहेत. यामध्ये AICC सचिव, यूथ कांग्रेस, महिला कांग्रेस पदाधिकारी या पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. पत्रात म्हंटले की, आम्ही राहुल गांधी बरोबर सामूहिकपणे राजीनामा देत आहोत.

राजीनाम्या देणाऱ्या मोठ्या नेत्यांमध्ये दिल्ली काँग्रेस कार्यकारी अध्यक्ष राजेश लिलोथिया यांचा देखील समावेश आहे. हरियाणाचे प्रदेश महिला काँग्रेस अध्यक्ष सुमित्रा चौहान यांचा देखील या राजीनाम्यत समावेश आहे.