‘राफेल प्रकरणी पंतप्रधानच दोषी’ 

नवी दिल्‍ली : वृत्तसंस्था – राफेल फाईल्स गायब झाल्या म्हणजे त्यात नक्कीच काहीतरी काळंबेरे आहे असा गंभीर आरोप काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांंनी केला आहे. पंतप्रधान हे राफेल प्रकरणी दोषी आहेत आणि त्यांचे ‘क्रिमिनल इनव्हेस्टिगेशन’ झालेच पाहिजे अशी मागणीही राहुल गांधी केली आहे. विशेष म्हणजे फ्रान्सच्या माजी अध्यक्षांकडून थेट मोदींच्या सहभागाचा उल्लेख करण्यात आलेला आहे. असे असतानाही पंतप्रधान मोदींना वाचवण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचे दिसत आहे असेही राहुल गांधी म्हणाले.
काल सुप्रिम कोर्टात राफेल डील प्रकरणी सुनावणी सुरु होती. यादरम्यान राफेल डिलच्या फाईल्स संरक्षण मंत्रालयातून चोरीला गेल्या आहेत अशी माहिती सरकारतर्फे सुप्रिम कोर्टात देण्यात आली. यानंतर आज लगेचच राहुल गांधी यांनी याबाबत पत्रकार परिषद घेतली. यावेळी पत्रकार परिषदेत बोलताना राहुल गांधी म्हणाले की, “पंतप्रधानांनी राफेल डीलमध्ये समांतर बोलणी सुरू केली होती. त्यांनी अशी बोलणी का केली हाच खरा कळीचा मुद्दा आहे. त्याबाबतचा उल्लेख फाईल्समध्ये आहे. त्यामुळे त्यांची चौकशी झाली पाहिजे. जर या प्रकरणात काही तथ्य नसेल तर ते चौकशीला का घाबरत आहेत” असा सवालही यावेळी राहुल गांधी यांनी केला.

अनिल अंबानी यांच्या फायद्यासाठी पंतप्रधान मोदींचा या डीलमध्ये प्रत्यक्ष सहभाग असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे. राहुल गांधी पुढे म्हणाले की, “अनिल अंबांनी यांच्या खिशात 30 हजार कोटी रुपये घालण्यासाठी मोदींनी हा सर्व खटाटोप केला आहे. राफेल डीलच्या या प्रकरणात मोदी दोषी आहेत त्यामुळे त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे. न्याय हा सगळ्यांना समान असायला हवा. या सर्व प्रकरणाची चौकशी करा. मोदींचीही चौकशी करा. त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे.” असे राहुल यांनी म्हटले आहे.

You might also like