मोदी सरकार देशामध्ये द्वेष पसरवतंय : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी

तिरुअनंतपुरम : वृत्तसंस्था – काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी मतदारांचे आभार मानण्यासाठी वायनाड लोकसभा मतदारसंघात गेले आहेत. तेव्हा केरळमधील नीलांबूर येथे झालेल्या सभेत राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला.

राहुल गांधी म्हणाले की, मोदी सरकार आणि नरेंद्र मोदी देशामध्ये द्वेष पसरवत आहेत. काँग्रेसला माहिती आहे की द्वेषावर मात करण्याचा एकमेव उपाय म्हणजे प्रेम आहे. आम्ही देशामधील कमकुवत लोकांना नरेंद्र मोदी यांच्या धोरणापासून वाचवण्यासाठी कटिबद्ध आहोत. वायनाडच्या जनतेला संबोधून बोलताना राहुल गांधी म्हणाले की, मी तुमचे प्रतिनिधित्व करण्यासाठी आणि वायनाडच्या विकासासाठी तयार आहे. वायनाडच्या प्रत्येक व्यक्तीसाठी माझ्या घरचे दरवाजे खुले आहेत.

या आधी राहुल यांनी मल्लापुरम येथे झालेल्या रोड शोला संबोधित केले होते. त्यांनी म्हंटले की, मी केरळचा खासदार आहे. हि माझी जबाबदारी आहे की मी फक्त वायनाड मतदारसंघातील नव्हे तर संपूर्ण केरळ राज्यातील मुद्यांविषयी संसदेत आवाज उठवेल. वायनाडच्या लोकांची मते ऐकणे आणि त्यांचा आवाज होणे हे माझे कर्तव्य आहे. तुम्ही दिलेल्या प्रेमांबद्दल मी तुमचा आभारी आहे.

शेतकऱ्यांच्या आत्महत्येविषयी केरळच्या मुख्यमंत्र्याना लिहिले होते पत्र

वायनाड लोकसभा मतदारसंघातून निवडून आल्यानंतर २४ मेला राहुल गांधी यांनी मतदारांचे आभार मानले होते. त्यानंतर ३१ मेला केरळचे मुख्यमंत्री पिनरई विजयन यांना पत्र लिहून वायनाडमध्ये कर्जाच्या कारणामुळे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांची माहिती मागितली होती. त्यांनी केरळ सरकारकडे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या आर्थिक मदतीत वाढ करण्याची मागणी केली होती.

राहुल गांधी यांनी अमेठी आणि वायनाड मतदारसंघातून लढवली होती निवडणूक

राहुल गांधी यांनी लोकसभेची निवडणूक उत्तरप्रदेशातील अमेठी आणि केरळमधील वायनाड लोकसभा मतदारसंघातून लढवली होती. अमेठी या पारंपरिक लोकसभा मतदारसंघात राहुल गांधी यांचा केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी पराभव केला आहे. तर वायनाड लोकसभा मतदारसंघातून राहुल गांधी विजयी झाले.