‘माझे राजकीय करिअर संपले तरी चालेल पण, मी खोटं बोलणार नाही’ : राहुल गांधी

नवी दिल्ली : भारत आणि चीन देशाच्या सैनिकांमध्ये झालेल्या चकमकीनंतर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी वारंवार मोदी सरकारवर टीका केलीय. ‘माझे राजकीय करिअर संपले तरी चालेल पण, मी भारतीय भूभागात चीनने केलेल्या घुसखोरीबाबत मी खोटं बोलणार नाही, असे वक्तव्य काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केले आहे. त्यांनी यासंदर्भात एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे.

राहुल गांधी यांनी सोमवारी एक व्हिडिओ ट्विट करत मोदी सरकारवर टीका केली आहे. चीनने भारताचा भूभाग बळकावला आहे, हे सत्य लपवून ठेवणे आणि त्यांना भारतीय भूमी बळकावू देणे, हे राष्ट्रविरोधी आहे. लोकांना याकडे आकर्षित करणे देशभक्ती आहे. मला माझ्या राजकीय कारकिर्दीची चिंता नाही. पण, मी खरं बोलत राहणार आहे, असे राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.

एक भारतीय असल्याने माझी प्राथमिकता देश आणि त्याची जनता आहे. हे स्पष्ट आहे की, चीनने आपल्या भूभागात घुसखोरी केलीय. चीनचे सैन्य आपल्या भूभागत तळ ठोकून आहे. मला या गोष्टीने मोठा त्रास होत आहे. माझे रक्त उसळत आहे की, दुसर्‍या देशाचे सैन्य आपल्या देशात घुसले आहे, असे म्हणत राहुल गांधी यांनी आपली अस्वस्थता याव्दारे व्यक्त केली आहे.

राजकीय दृष्टीने तुम्हाला वाटतं की, मी गप्प बसावे. पण, मी आपल्या लोकांना अंधारात का ठेवू? मी उपग्रह छायाचित्रे पाहिली आहेत. सैन्यातील अधिकार्‍यांशी बोललो आहे. तुम्हाला जर वाटत असेल की मी चीनच्या घुसखोरीबाबत खोटं बोलावं, तर ते शक्य नाही. मी तसे करणार नाही. देशाच्या नागरिकांना सत्य कळायला हवं. मला चिंता नाही, माझे राजकीय करिअर पूर्णपणे उद्धवस्त झाले तरी झालेल. पण, चीन आपल्या देशाच्या भूभागात घुसल्याबाबत मी खोटं बोलणार नाही. जे लोक चीनच्या घुसखोरीबाबत खोटं बोलत आहेत ते राष्ट्रवादी नाहीत, देशभक्त नाहीत, असाही हल्लाबोल राहुल गांधी यांनी यावेळी केला आहे.

दरम्यान, 15 जून रोजी भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये रक्तरंजित संघर्ष झाला होता. यात भारताचे 20 जवान शहीद झालेे. तर चीनने आपली जीवितहानी जाहीर करण्यास नकार दिला होता. चीनचे सैन्य पूर्व लडाखमध्ये घुसले आहे. त्यामुळे दोन्ही देशांमध्ये स्फोटक परिस्थिती निर्माण झालीय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीनने घुसखोरी केली नाही, असे म्हटलं होतं. मग, उपग्रह छायाचित्रे खोटं बोलतात का? नाही ना? , असे म्हणत काँग्रेसने टीका केलीय. गलवान खोर्‍यातील चीनच्या घुसखोरी या मुद्दावरुन काँग्रेस आणि राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर टीका केलीय.

…घुसखोरी नसेल तर जवान शहीद झाले कसे?
गलवान खोर्‍यात चीन देशाच्या सैन्यांनी भारत देशाच्या हद्दीत घुसखोरी करत भारतीय जवानांवर हल्ला केला आहे. यात वीस जवान शहीद झाले. त्यामुळे भारत आणि चीन देशांच्या सीमेवर पुन्हा तणाव निर्माण झाला तरीही, भारतीय जवानांना योग्य तो आदेश देण्यात आला नाही. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गलवान खोर्‍यात कोणीही घुसखोरी केली नाही, असे जाहीर केले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी असे सांगत असताना त्यांनी चीन देशाचे नाव घेतले नाही. यावरून काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना चांगलेच टीकास्त्र करून घेरले आहे.

जर गलवान खोर्‍यात चीनच्या सैनिकांनी घुसखोरी करून हल्ला केला नसेल तर मग, भारताचे वीस जवान कसे काय शहीद झाले? या प्रश्नाचे समाधानकारक उत्तर भाजप आणि मोदी सरकारकडून अद्याप देण्यात आलेले नाही. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील वीस जवान शहीद कसे झाले? याचा योग्य खुलासा केला नसल्याने पुन्हा पुन्हा काँग्रेसचे नेते राहुल गांधी हाच मुद्दा उचलून धरून जनतेला सत्य सांगण्याची मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे करत आहेत.