राहुल गांधींची आग्रही मागणी, म्हणाले – ‘प्रत्येकाला कोरोनाची लस मोफत मिळायलाच हवी’

नवी दिल्ली: पोलीसनामा ऑनलाइन – देशात उद्यापासून (दि. 1 मे) कोरोना लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्याला सुरुवात होत असून, 18 वर्षांवरील सर्वांना लस देण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा कोरोनाची लस मोफत मिळायला हवी, अशी आग्रही मागणी केली आहे.

राहुल गांधींना कोरोनाची बाधा झाली असून सध्या ते गृहविलगीकरणात आहेत. गेल्या काही दिवसांपासून राहुल गांधी सातत्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारच्या धोरणांवर टीका करताना दिसत आहेत. आताही कोरोनाची लस मोफत मिळण्यासंदर्भात त्यांनी पुन्हा एकदा ट्विट करत मागणी केली आहे. देशाला कोरनाची लस मोफत दिली पाहिजे. सर्व नागरिकांना विनामूल्य रोगप्रतिबंधक लस टोचणे आवश्यक आहे. आशा करूया की ती प्रत्येकाला मोफत मिळेल, असे ट्विट गांधीनी केले आहे. यावेळी राहुल गांधी #vaccine हा हॅशटॅगही वापरला आहे. दरम्यान आता देशातील प्रत्येक नागरिकाला मोफत लस मिळाली पाहिजे. बस्स. भारताला भाजपच्या सिस्टमचा विक्टिम बनवू नका. मोदी सरकारने हे लक्षात घ्यावे की ही लढाई कोरोनाविरोधात आहे, काँग्रेस किंवा अन्य राजकीय पक्षाविरोधात नाही, अशी टीका करणारे ट्विट राहुल गांधी यांनी यापूर्वीही केले होते.