Video : ‘एम्सच्या अहवालामुळं भाजपचं तोंड काळं झालंय अन् त्यांच्या कटकारस्थानांचा पर्दाफाश झालाय’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन –  बॉलिवूड स्टार सुशांत सिंह राजपूत प्रकरणावरून सध्या राजकारणंही तापलं आहे. सुशांतच्या मृत्यूप्रकरणी एम्सनं सीबीआयला अहवाल दिल्यानंतर आता काँग्रेसनं भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. एम्सच्या अहवालामुळं भाजपचं तोंड काळं झालं आहे. भाजपच्या कटकारस्थानांचा पर्दाफाश झाला आहे. अशी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे.

सचिनं सावंत यांनी ट्विट करत भाजपवर निशाणा साधला आहे. सचिन सावंत म्हणतात, “एम्सच्या अहवालामुळं भाजपचं तोंड काळं झालं आहे. भाजपच्या कटकारस्थानांचा पर्दाफाश झाला आहे. गुप्तेश्वर पांडे यांना उगाच नाही स्वेच्छानिवृत्ती दिली. मुंबई पोलिसांना ज्या वाईट पद्धतीनं बदनाम करण्यात आलं, महाराष्ट्राचा अपमान केला गेला ते पाहता महाराष्ट्राची जनता भाजपला कधीच माफ करणार नाही” असंही सावंत म्हणाले आहेत.

‘मोदी सरकारचं देशपातळीवरचं अपयश लपवण्यासाठी सुशांत प्रकरणात एक षडयंत्र रचलं गेलं’

सचिन सावंत म्हणतात, “एम्सनं सुशांत सिंह राजपूत प्रकरणात निर्वाळा दिला की, त्याच्या शरीरात कोणतंही विष आढळलं नाही. यातून भाजपचे तोंड काळे झाले आहे. मुंबई व महाराष्ट्राची बदनामी करण्यासाठी षडयंत्र करण्यामागे भाजप आणि मोदी सरकारमधील मास्टरमाईंड सीबीआयनं चौकशी करून शोधावे.”

“मोदी सरकराचं देश पातळीवरचं अपयश लपवण्यासाठी सुशांत प्रकरणात एक षडयंत्र रचलं गेलं. राजकीय कटकारस्थान करून तीन तपास संस्थांना महाराष्ट्रात आणलं गेलं. संघराज्य चौकटीच्या चिंधड्या उडवल्या गेल्या. राजकारणासाठी बिहार पोलिसांचा वापर केला गेला. मोदी सरकार पुरस्कृत मीडिया ट्रायलचा आम्ही निषेध करतो” असंही सावंत म्हणाले आहेत.