देश दु:खात असताना पंतप्रधान शूटींगमध्ये व्यस्त होते

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पुलवामा हल्ल्याच्या आठवडयाभरानंतर काँग्रेसने मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे. पुलवामा इथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देश दु:खात बुडालेला असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी हे डिस्कव्हरी चॅनेलच्या डॉक्युमेट्रीसाठी जिम कॉर्बेट अभयारण्यात शूटींगमध्ये व्यस्त होते असा आरोप काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी केला आहे. पंतप्रधान मोदी हे असंवेदनशील असून त्यांनी शहिदांना नवी दिल्लीतील विमानतळावर श्रद्धांजली वाहण्यासाठी राजकारणासाठी एक तास उशीर केल्याचाही आरोप सुरजेवाला यांनी केला आहे.

काय म्हणाले रणदीप सुरजेवाला – पंतप्रधान मोदींनी पुलवामा हल्ल्याला गांर्भीयाने घेतले नसल्याचा आरोप करत सुरजेवाला म्हणाले की, पुलवामा दहशतवादी हल्ल्यात आपले जवान शहीद झाल्यानंतर संपूर्ण देश शोकसागरात बुडाला होता. त्याचवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तराखंडच्या जीम कॉर्बेट नॅशनल पार्कमध्ये संध्याकाळपर्यंत एका फिल्मसाठी व्हिडिओ शूटिंग करण्यामध्ये व्यस्त होते. जगात तुम्ही असा पंतप्रधान कुठे पाहिला आहेत का ? नरेंद्र मोदींना राजधर्माचा विसर पडला असून ते सत्ता वाचवण्याच्या मागे लागले आहेत. शहीदांच्या सन्मानापेक्षा नरेंद्र मोदींना सत्तेची लालसा जास्त आहे. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी आसामच्या सभेत पुलवामा दहशतवादी हल्ल्यावरुन राजकारण केले.’

जम्मू-काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात गुरुवारी दहशतवादी हल्ल्यात भारताचे ४० जवान शहीद झाले. पुलवामा दहशतवादी हल्यानंतर शाहिदांच्या श्रद्धांजली बरोबरच राजकीय आरोप प्रत्यारोपांचे सत्र देखील सुरु आहे. पुलवामा हल्ल्याच्या आठवडयाभरानंतर काँग्रेसने पंप्रधानांना बेजबाबदार म्हणत मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे.