…तरच काँग्रेसबरोबर नॅशनल कॉन्फरन्सची आघाडी : उमर अब्दुल्ला

जम्मू-काश्मीर : वृत्तसंस्था – आगामी लोकसभा निवडणुका काही दिवसांवरच येऊन ठेपल्या आहेत. त्यामुळे अनेक पक्षांची युती-आघाडीची समीकरणे जुळवण्याची कामे सुरु आहेत. भाजप आणि काँग्रेस या प्रमुख पक्षांनी विविध राज्यातील प्रादेशिक पक्षांबरोबर आघाडी करण्यास सुरुवात केली आहे. जम्मू आणि काश्मीरमध्ये काँग्रेसबरोबर नॅशनल कॉन्फरन्स आघाडी करण्याबाबत नॅशनल कॉन्फरन्सचे नेते आणि माजी मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी संकेत दिले आहेत. मात्र त्यासाठी त्यांनी काही अटी ठेवल्या आहेत.

जम्मू आणि काश्मीरमध्ये काँग्रेस नॅशनल कॉन्फरन्सबरोबर आघाडी करणार असल्याची चर्चा होती. या चर्चेला दुजोरा देताना उमर अब्दुल्ला म्हणले आहेत की  ‘काँग्रेसकडून जम्मू काश्मीरमध्ये लोकसभेसाठी आघाडी करण्याबाबत प्रस्ताव आला आहे. त्यांना आम्ही सांगितले आहे की काश्मीर खोऱ्यातील तीनही लोकसभेच्या जागांवर फक्त नॅशनल कॉन्फरन्सचाच उमेदावर असेल. जर हे मान्य असेल तर इतर जागांबाबत चर्चा करण्यात येईल. आता याच्यावर त्यांचे काय उत्तर येते हे बघावे लागेल.’

काश्मीर विधानसभा निवडणूक –
लोकसभेसोबतच आंध्र प्रदेश, ओडिशा, अरुणचाल प्रदेश आणि सिक्किम या चार राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकाही घेण्याचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने १० मार्च रोजी जाहीर केला. मात्र, दहशतवादामुळे नाजूक स्थिती असलेल्या जम्मू-काश्मीरमध्ये सध्या विधानसभा निवडणूक न घेण्याचे आयोगाने ठरविले. परिणामी गेल्या जूनपासून लोकनियुक्त सरकार नसलेल्या या राज्यास त्यासाठी आणखी प्रतिक्षा करावी लागणार आहे.