काँग्रेसचे अध्यक्षपद स्वीकारणार का ? सुशील कुमार शिंदे म्हणाले…

पोलीसनामा ऑनलाईन टीम : काँग्रेस अध्यक्षपदासाठी आपल्या नावाची चर्चा होत आहे. तुम्हाला संधी मिळाली तर काँग्रेसचे नेतृत्व करणार का ? या प्रश्नावर माजी केंद्रीय मंत्री आणि कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे म्हणाले की, खरे म्हटले तर मला काही माहिती नाही. आता काही सांगता येत नाही. बाजारात तुरी आणि कशाला मारी या म्हणीचे त्यांनी उदहारण दिले. दरम्यान औरंगाबादच्या नामांतरासंदर्भातही शिंदे यांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, हा सरकार मधील प्रश्न आहे. मी सरकार बाहेरील व्यक्ती आहे.

सुशीलकुमार शिंदे शनिवारी (दि. 23) पुण्यातील बालगंधर्व रंग मंदिरात एका कार्यक्रमासाठी आले होते. त्यावेळी त्यांनी दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणींना उजाळा दिला. शिंदे म्हणाले की, बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे सर्व जाती धर्माचे लोक येत असत. बाळासाहेब ठाकरे यांनी साबीर शेख या मुस्लिम व्यक्तीला आमदार आणि मंत्री देखील केले.

हे बाळासाहेब सर्व धर्मीय होते, याचे उत्तम उदाहरण आहे. हिंदुत्वाचा विचार करणारा, तसेच सर्व धर्माची भूमिका मांडणारा आणि महाराष्ट्र वाचवणारा थोर नेता म्हणजे बाळासाहेब असे ते म्हणाले. माझ्या दोन मुस्लिम अंगरक्षकांबरोबरही बाळासाहेबांच्या रात्री-बेरात्री गप्पा रंगायच्या ही आठवणही त्यांनी सांगितली.