प्रवीण दरेकरांचा पलटवार, म्हणाले – ‘छत्रपतींच्या सन्मानाबद्दल आम्हाला काँग्रेसने शिकवू नये’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी मराठा आरक्षणावरून केलेल्या टीकेला विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी उत्तर दिले आहे. मराठा समाजाला भाजपनेच आरक्षण दिले आणि छत्रपती संभाजीराजे यांना खासदारही भाजपनेच बनवले. त्यामुळे मराठा आरक्षण असो किंवा छत्रपतींचा सन्मान याबद्दल भाजपला शिकविण्याची गरज नाही, अशा शब्दात दरेकर यांनी काँग्रेसला फटकारले आहे.

दरेकर म्हणाले की, काँग्रेसने आजवर कोल्हापूरच्या छत्रपतींचा काय सन्मान केला, हे उघडच आहे. त्याबद्दल आधी सचिन सावंतांनी सांगावे. स्वतःला कधीतरी आमदारकी मिळेल याची वाट पाहत बसलेल्या सावंतांनी उगाच छत्रपती संभाजीराजे यांची उठाठेव करू नये असे दरेकरांनी म्हटले आहे. केंद्रात भाजपची सत्ता आल्यावर छत्रपती संभाजीराजे यांना राष्ट्रपती नियुक्त राज्यसभा खासदार केले. त्यापाठोपाठ प्रयागराज येथे झालेल्या भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत तत्कालीन भाजपाध्यक्ष अमित शाह यांनी संभाजीराजेंचा सन्मान पक्षाच्या सर्व ज्येष्ठ नेत्यांसमोर भर सभागृहात केला. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह सर्वांनी उभे राहून संभाजीराजेंचे अभिनंदन केले, याची आठवणही दरेकरांनी करून दिली आहे.