आता काँग्रेसच्या महाराष्ट्रातील प्रवक्त्यांच्या भावावर बलात्काराचा आरोप, पोलिसांनी केली सुनीत वाघमारेला अटक

पोलीसनामा ऑनलाइन टीम –   राज्यातील महाविकास आघाडी सरकारची धनंजय मुंडे आणि संजय राठोड यांच्या प्रकरणांमुळे आधीच नाचक्की झाली आहे. आता पुन्हा महाविकास आघाडीमधील अजून एका नेत्याच्या भावावर बलात्काराचे (Rape Case) गंभीर आरोप झाले आहे. काँग्रेसचे प्रवक्ते राजू वाघमारे (Raju Waghmare) यांच्या भावावर एका महिलेने बलात्काराचा आरोप केला आहे.

या प्रकरणी मुंबईतील भोईवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर संबंधित आरोपीवर अटकेची कारवाई झाली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ प्रवक्ते राजू वाघमारे यांचे भाऊ सुनीत वाघमारे यांच्याविरोधात एका महिलेने बलात्कार, फसवणूक आणि धमकावल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी मुंबईतील भोईवाडा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर पोलिसांनी कारवाई करून सुनीत वाघमारे याला अटक केली आहे. तसेच या प्रकरणाचा तपास आता लोणावळा पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे.

दरम्यान, या प्रकरणावरून विरोधी पक्ष आक्रमक होण्याची चिन्हे दिसू लागल्याने काँग्रसने या प्रकरणाशी आणि सुनीत वाघमारे याच्याशी पक्षाचा संबंध नसल्याचे स्पष्ट केले आहे. सुनीत वाघमारे यांची चार वर्षांपूर्वीच पक्षातून हकालपट्टी करण्यात आली होती, असे काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी सांगितले. याबाबत केलेल्या ट्विटमध्ये सचिन सावंत म्हणाले की, काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते राजू वाघमारे यांचे बंधू सुनीत वाघमारे यांच्यासंदर्भात भाजपा फार चिंतन करत असल्याचे कळले. माहितीसाठी सांगतो. सुनीत वाघमारे यांचा काँग्रेसशी कोणताही संबंध नाही. २०१७ साली मुंबई महानगरपालिका निवडणुकीत पक्षविरोधी काम केल्याने त्यांना पक्षातून काढून टाकण्यात आले आहे.

विधिमंडळ अधिवेशनाला कालपासून सुरूवात झाली. या विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये भाजपाने राज्य सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. संजय राठोड यांच्या राजीनाम्यानंतरही त्यांच्याविरोधात कारवाईसाठी भाजपा आक्रमक आहे. तर मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणीही भाजपाने पुन्हा पुढे आणली आहे. त्यातच आता काँग्रेसच्या प्रवक्त्याच्या भावालाच बलात्कार प्रकरणात अटक झाल्याने महाविकास आघाडीसमोरील अडचणी अधिकच वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.