सोनिया व राहुल गांधींना हात लावल्यास जनता रस्त्यावर उतरेल : चव्हाण

वाशिम : पोलीसनामा आॅनलाइन – सोनिया गांधी, राहुल गांधी यांना आम्ही बघून घेऊ, ही भाषा पंतप्रधानांना शोभत नाही. जनतेने जोपर्यंत आम्हाला सन्मानाने पदावर बसविले तोपर्यंत आम्ही बसलो; आणि नंतर जनतेत गेलो, पण अशी भाषा केली नाही. राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांना हात लावला तर देशातील जनता रस्त्यावर आल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी जनसंघर्ष यात्रेनिमित्त वाशिम येथील महेश भवन येथे आयोजित सभेत दिला.

अशोक चव्हाण म्हणाले, असे धमक्या देणारे सरकार आपल्याला राज्यात आणि केंद्रात पुन्हा निवडून द्यायचे काय? याचा विचार करण्याची गरज आज निर्माण झाली आहे. कारण देशातील वातावरण आपण जानतच आहात. हे सरकार पुन्हा पाच वर्षांसाठी निवडून दिल्यास पुन्हा निवडणुकाच होणार नाहीत. या देशात लोकशाही जिवंत राहणार नाही तर हुकूमशाही येईल. ११ डिसेंबर रोजी पाच राज्यांतील निवडणुकांचे निकाल हाती येणार आहेत. त्यानंतर कदाचीत राज्यात आणि देशात लोकसभा, विधानसभेच्या निवडणुका होतील. १५ फेब्रुवारीला आचारसंहिताही लागेल. विधानसभा आणि लोकसभा या दोन्ही निवडणुकांसाठी आम्ही सज्ज आहोत.

८९ लाख शेतकऱ्यांना ३४ हजार कोटींची कर्जमाफी जाहीर करणाऱ्या सरकारने आतापर्यंत फक्त १२ हजार कोटी दिले आहेत. आजपर्यंत ११ हजार ७०० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. कधीकाळी उद्योग गुंतवणूक आणि कृषी उत्पादनामध्ये प्रथम क्रमांकावर राहणारे राज्य आज गुन्हे आणि शेतकरी आत्महत्यामध्ये पहिल्या क्रमांकावर आहे, अशी टीकाही चव्हाण यांनी यावेळी केली. या सभेला माणिकराव ठाकरे, शिवाजीराव मोघे, वसंत पुरके, अनंतराव देशमुख, आमदार अमित झनक, आमदार वजाहत मिर्झा, आमदार हरिभाऊ राठोड, श्याम उमाळकर आदि उपस्थित होते.