काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा केंद्राबरोबरच राज्यपालांवर जोरदार हल्लाबोल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी इंधन दरवाढ, महागलेला गॅस सिलेंडर याबाबत केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. त्याबरोबरच त्यांनी राज्याचे राज्यपाल भगत भगतसिंग कोश्यारी यांच्या कार्यपद्धितीबाबतही त्यांनी निशाणा साधला आहे.

नाना पटोले म्हणाले, विधिमंडळ कामकाजासाठी माझ्या सहीने एकूण १६ समित्या तयार केल्या आहेत. या समित्यांमध्ये राज्यपाल नियुक्त १२ सदस्यांच्या जागा रिक्त आहेत. जर या जागा रिक्त असेल तर त्या क्षेत्राच्या लोकांना न्याय मिळणार नाही. त्यामुळे या सर्व समिती असंविधानिक ठरू शकतात. जर कामकाज संविधानिक नसेल तर या सर्व समित्या राज्य सरकारला रद्द कराव्या लागतील, यावरूनच राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या भूमिकेवरही नाना पटोले यांनी नाराजी व्यक्त केली.

या दरम्यान, मोदी सरकार हे देश बरबाद करायला लागले आहेत आणि जनतेलाही बरबाद करायला लागले आहेत. सरकारने गोर गरिबांच्या तोंडचे पाणी पळवले आहे. पेट्रोल पंपावरती पंतप्रधान मोदी यांनी स्वतःच्या तोंडाला पट्टी बांधली आहे. निर्लज्ज म्हणता येणार नाही मात्र जे काही सुरू आहे त्यावर कॉंग्रेस गप्प बसणार नाही, असा जोरदार हल्लाबोल नाना पटोले यांनी केंद्र सरकारवर केला आहे.