‘पाकिस्तान’ला फुकट पण भारतीयांना विकत? नाना पटोलेंनी मोदी सरकारवर गंभीर आरोप करत केली ‘ही’ मागणी

पुणे – इंग्रज राजवटीत भारतात स्पॅनिश फ्लू आला होता. इंग्रजानीही त्यावेळी भारतीयांना मोफत लस दिली होती. पण सध्याचे केंद्र सरकार पाकिस्तानला मोफत लस देत आहे, तर भारतीयांना विकत आहे. हा सर्व व्यवहार नफेखोरीसाठीच सुरू आहे. महाराष्ट्रच नव्हे तर सर्व राज्यांना मोफत लस उपलब्ध करून द्यावी अशी मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली असल्याची माहिती काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.

नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस च्या पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्यामार्फत पंतप्रधान कार्यालयाला निवेदन दिले. यानंतर विधानभवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. याप्रसंगी काँग्रेस चे शहर अध्यक्ष रमेश बागवे यांच्यासह आजी माजी आमदार व पदाधिकारी उपस्थित होते.

नाना पटोले म्हणाले की, देशात लस उत्पादन करणाऱ्या दोनच कंपन्या आहेत. यापैकी पुण्यात असलेल्या सिरम कंपनीने केंद्र सरकारला 150 रुपयांत, राज्य सरकारला 400 रुपये आणि खासगी मध्ये 600 रुपये दर जाहीर केला आहे. मुळातच केंद्र सरकारने कोरोना ही राष्ट्रीय महामारी म्हणून जाहीर केली आहे. त्यामुळे लसीकरण ही प्रामुख्याने केंद्र सरकारची जबाबदारी आहे. ज्या देशात लसीकरण झाले तेथील कोरोना कमी झाला. तिथे लॉकडाऊन करायची गरज राहिली नाही. आपल्याकडे जानेवारी मध्येच मोठ्या प्रमाणावर लसीकरण सुरू झाले असते तर आज ऑक्सिजन, रेमडीसीविर इंजेक्शन , बेड साठी धावाधाव करायची गरज भासली नसती. अनेक जीव वाचले असते.

परंतु केंद्रीय आरोग्य विभागाने मार्च महिन्यात कोविड गेला आहे असे जाहीर केल्याने अनेक यंत्रणा शिथिल झाल्या त्याचा परिपाक हा देशाच्या प्रत्येक भागात दिसतोय याला कारणीभूत केवळ केंद्र सरकार आहे. ऑक्सिजन चा प्रश्न निर्माण झाला आहे. दिल्लीत 26 जण ऑक्सिजन न मिळाल्याने दगावले. दिल्लीत अशी परिस्थिती असेल तर बाकीचं देशातील परिस्थिती विचार न केलेला बरा. लसीकरण केले असते तर ही परिस्थिती उद्भवली नसती.

इंग्रजानी 120 वर्षांपूर्वी स्पॅनिश फ्लू आला त्यावेळी भारतात फुकट लस दिल्या होत्या, पोलिओ चे डोस व इतर साथीच्या वेळीही मोफत लसीकरण झाले आहे. परंतु लस उत्पादन करणाऱ्या दोनच कंपन्यांना मोनोपॉली करून दिली. इतरांना परवानगी दिली नाही. केंद्रात अगोदर हम दो हमारे दो असे धोरण होते, परंतु कोरोना काळात नफेखोरी साठी परिवाराचा विस्तार केल्याचे दिसते.

सर्वांचे लसीकरण करावे असे राहुल गांधी, सोनिया गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग सातत्याने केंद्र सरकारला सूचना करत होते. त्यावेळी भाजपचे भाडोत्री खालच्या स्तरावर जाऊन त्यांची टिंगल करत होते. त्यांच्या सूचनांचे पालन केले असते तर आज राज्याराज्यात मृतदेहांचे खच पडलेले दिसले नसते.

गुजरात, उत्तर प्रदेश मध्ये मृतांचा खच पडला आहे. तिथे कोरोनाग्रस्तांचे आणि मृतांचे आकडे लपवले जात आहेत. केवळ महाराष्ट्रात सत्य परिस्थिती दाखवली जात आहे. कोरोना बाबत सर्वात सजग राज्य महाराष्ट्र आहे. महाराष्ट्राच्या सीमेवर अन्य राज्य आहेत. त्या राज्यातही कोरोनाची अशीच परिस्थिती आहे. राष्ट्रीय महामारी म्हणून एकत्रित नियोजन करणे ही केंद्र सरकारची जबाबदारी आहे. परंतु अशाही परिस्थितीत केवळ राजकारण केले जात आहे, हे दुर्दैवी आहे.

पाकिस्तानला फुकट देता व येथील जनतेला विकत देताय मग भारतीयांना विकत का? जनतेचा पैसा कंपन्यांना ऍडव्हान्स दिला आहे. संपूर्ण देशात मोफत लस द्यावी. जामनगरला विमानाने टँकर पाठवून आम्ही ऑक्सिजन आणत आहोत असे त्यांनी सांगितले.

पुढची लाट येत आहे. त्यासाठी तयारी ठेवली पाहिजे. राज्याने इथे लस मिळत नसेल तर आम्हला परदेशातून लस खरेदी करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी केंद्र सरकारकडे केली आहे. पुढची लाट येत आहे. त्यासाठी तयारी ठेवली आहे. संसर्ग बाबत केंद्र जबाबदारी आहे.

कोरोनाच्या अपयशावरून लक्ष विचलित करण्यासाठी देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल

कोरोनाने विक्राळ रूप धारण केले आहे. ऑक्सिजन, रेमडीसीविर, बेड्स असे अनेक प्रश्नांना तोंड द्यावे लागत आहे. ही बाब मार्च मध्ये कोरोना गेल्याचे जाहीर करणाऱ्या केंद्र सरकारच्या अंगलट आली आहे. यावरून जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर सीबीआय करवी गुन्हा दाखल करून छापेमारी सुरू आहे, असा आरोप नाना पटोले यांनी यावेळी केला.