कोरोना परिस्थितीवरून काँग्रेसचे फडणवीसांनाच आवाहन; म्हटले – ‘केंद्राशी दोन हात करण्यासाठी पुढे या’

मुंबई : राज्यात कोरोनाबाधितांची वाढती संख्या पाहता आरोग्य यंत्रणेवर याचा मोठा ताण जाणवत आहे. रेमडेसिव्हिर, ऑक्सिजनअभावी अनेक कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता या सर्वांचे जीव वाचवणे ही आपली बांधिलकी जपावी आणि केंद्राशी दोन हात करण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना केले.

केंद्र सरकारच्या कोरोनाबाबतच्या अनेक धोरणांवरून नाना पटोले सातत्याने सरकारवर टीका करत आहेत. आता त्यांनी भाजप नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राजकारण बाजूला ठेवून महाराष्ट्रातील जनतेशी आपली बांधिलकी जपावी, असे म्हटले आहे. तसेच रुग्णांचे जीव वाचवणे आपली जबाबदारी आहे. त्यासाठी बांधिलकी जपावी आणि केंद्र सरकारशी दोन हात करण्यासाठी पुढे यावे. महाराष्ट्रात भाजपची सत्ता नाही म्हणून मराठी माणसाला इंजेक्शन द्यायचे नाही हे बरोबर नाही. राज्यातील विरोधी पक्ष नेत्यांनी महाराष्ट्रातील जनतेच्या जीवाचे मोल लक्षात घेतले पाहिजे, असे नाना पटोले यांनी म्हटले आहे.

याशिवाय राज्यात कोरोना परिस्थिती अत्यंत बिकट होत आहे. त्यातच केंद्र सरकारकडून महाराष्ट्राशी दुजाभाव केला जात आहे. त्यामुळे आपण गप्प बसू चालणार नाही. ही वेळ राजकारण करण्याची नाही. या परिस्थितीत फडणवीस यांनी राज्य सरकारबरोबर एकत्र येऊन महाराष्ट्राचा आवाज बनून केंद्र सरकारकडे भांडले पाहिजे, असेही पटोले म्हणाले.