पीकविमा भरपाई संदर्भात काँग्रेसतर्फे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

लासलगाव : पोलीसनामा ऑनलाइन – कृषीतज्ञ सचिन आत्माराम होळकर यांनी जिल्हाधिकारी यांना पिक विमा भरपाई संदर्भात निवेदन दिले आले. गेल्या वर्षीच्या खरीप हंगामामध्ये कृषी विभागाच्या प्रचार आणि प्रसार यामुळे अनेक शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत पैसे भरून मका, सोयाबीन, भात इत्यादी पिकांचा पिक विमा काढला होता. मात्र खरीप हंगाम संपते वेळी जिल्ह्यामध्ये तसेच राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस आणि पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे खरिपातील जवळपास सर्वच पिके कमी अधिक प्रमाणात नुकसान ग्रस्त झाले होते.

विमाधारक शेतकऱ्यांनी त्यांच्या नुकसानीची तक्रार तसेच अहवाल आणि इतर कागदपत्रे पीक विमा कंपनीकडे जमा केली होती. मात्र आजतागायत पिक विमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांना कोणतीही नुकसान भरपाई प्राप्त झाली नाही. येत्या काही दिवसात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे न मिळाल्यास वरिष्ठ पातळीवर आंदोलन तसेच पिक विमा कंपन्या विरुद्ध ग्राहकमंच यांच्याकडे रीतसर तक्रार दाखल करण्याचा इशारा सचिन होळकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

महाराष्ट्रात अजूनही कोणत्याही शेतकऱ्याला खरीप हंगामाचा पिक विमा नुकसान भरपाई चा मोबदला मिळाला नाही. याकडे शासनाने त्वरित लक्ष देण्याची गरज आहे. अन्यथा पीक विमा फक्त विमा कंपन्यांना करण्यासाठी आहे की काय असा प्रश्न निर्माण होतो. यासंदर्भात चे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे यांनी घेतले. तसेच त्यांनी तातडीने निवेदनाची दखल घेत जिल्हा कृषी अधीक्षक संजीव पडवळ यांच्याशी संपर्क करून सदर निवेदनाची माहिती दिली आणि लवकरात लवकर हा प्रश्न निकाली काढण्याचे आश्वासन काँग्रेस पदाधिकाऱ्यांना दिले.

निवेदन देतेवेळी कृषी तज्ञ सचिन आत्माराम होळकर तसेच ओबीसी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष सुरेश कुमावत, काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या माजी जिल्हा परिषद सदस्य माजी जिल्हा बँक उपाध्यक्षा निर्मलाताई खर्डे, महिला काँग्रेसच्या पदाधिकारी जयश्री नगरे, किसान काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष स. का. पाटील आदी काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते. सदर निवेदनाची एक प्रत जिल्हा कृषी अधीक्षक यांच्याकडे पाठवली आहे.