‘नाशिकला दत्तक घेतो, पालकत्व असं मध्येच सोडायचं नसतं साहेब’ !, काँग्रेसचा फडणवीसांना खोचक टोला (व्हिडीओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढत आहे. दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत आहे. यामुळे राज्यातील आरोग्य यंत्रणेवर ताण पडत आहे. यावरुन आरोप प्रत्यारोपाचे राजकारण सुरु आहे. अशातच नाशिक महापालिकेच्या डॉ. झाकीर हुसैन रुग्णालयात झालेल्या दुर्घटनेनंतर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राजकारण रंगू लागले आहे. नाशिक महापालिकेत सध्या भाजपची सत्ता आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसने माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकीच्यावेळी नाशिकमध्ये केलेल्या आवेशपूर्ण भाषणाचा व्हिडीओ ट्विट करुन बोचरी टीका केली आहे.

भाषणादरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी मी नागपूरचा आहे पण नागपूर सांभाळण्यासाठी नितीन गडकरी खंबीर आहेत. मी नाशिकला दत्तक घेत असून या शहराचा चेहरामोहरा बदलेन, अशी घोषणा केली होती. काँग्रेसने फडणवीस यांच्या वक्तव्याचा धागा पकडून त्यांच्यावर टीका केली आहे. एकदा पालकत्व घेतल्यानंतर ते असं मध्येच सोडायचं नसतं, देवेंद्र फडणवीस साहेब, अशी कॅप्शन या व्हीडीओला देण्यात आले आहे. त्यामुळे आता भाजप काँग्रेला कसे प्रत्युत्तर देते हे पहावे लागले.

काय आहे प्रकरण ?

नाशिकमधील महापालिकेच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजनची गळती झाल्याने ऑक्सिजनअभावी 22 रुग्णांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. रुग्णालयातील ऑक्सिजन टँकमधून गळती झाल्याने हजारो लिटर लिक्वीड स्वरुपातील ऑक्सिजन वाया गेले. यावेळी रुग्णालयातील अनेक कोरोना बाधित रुग्णांवर उपचार सुरु होते. यातील 150 जण व्हेंटिलेटरवर होते. रुग्णालयात अचानक ऑक्सिजन लीक झाल्याने रुग्णांना होणारा पुरवठा बंद झाला. त्यामुळे व्हेंटिलेटरवर असलेल्या रुग्णांपैकी 22 जणांचा तडफडून मृत्यू झाला. ऑक्सिजनच्या प्रेशरमुळे नोझल तुटल्याने ही दुर्घटना घडली.