मध्य प्रदेशातील काँग्रेसचं सरकार प्रचंड अडचणीत, आणखी 20 आमदार बंडखोरीच्या तयारीत

पोलीसनामा ऑनलाईन टीम – मध्य प्रदेशात सत्तासंघर्ष शिगेला पोहचला असून काँग्रेसचे आणखी 20 आमदार बंडखोरीच्या तयारीत आहेत. त्यामुळे त्यांची लवकरच भाजपमध्ये प्रवेश करण्याची इच्छा असल्याचा दावा या राज्यातील 22 बंडखोर आमदारांनी मंगळवारी केला आहे. त्यामुळे कमलनाथ सरकारचा पाय आणखी चिखलात रुतला आहे. नजीकच्या भविष्यात राज्यात मोठी राजकीय उलथापालथ होण्याचे संकेत मिळत आहेत.

काँग्रेसच्या 22 बंडखोर आमदारांनी यापुर्वीच ज्योतिरादित्य शिंदे हे आमचे नेते आहेत, आम्ही अनेक वर्षांपासून त्यांच्यासमवेत राजकारणात आहोत, आमच्यापैकी बहुसंख्य जण शिंदे यांच्यामुळेच राजकारणात आहोत, भाजपमध्ये प्रवेश करण्याची आमची इच्छा आहे, केंद्रीय पोलिसांकडून आम्हाला संरक्षण मिळाल्यास आम्ही मध्य प्रदेशमध्ये जाऊन भाजपमध्ये प्रवेश करण्याचा विचार करू, असे स्पष्ट केले आहे. आणखी 20 आमदार आमच्यासोबत असल्याचा दावा या 22 बंडखोरांनी केला आहे, मात्र त्यांना डांबून ठेवण्यात आले आहे, ते आमच्यासमवेत आल्यास काँग्रेसमध्ये स्पष्टपणे फूट पडेल आणि नव्या गटावर कोणत्याही कायद्यान्वये कारवाई होऊ शकणार नाही, असा दावाही केला जात आहे.

मध्य प्रदेश विधानसभेत तातडीने बहुमत चाचणी घेण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी करणारी याचिका माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी केली असून त्याबाबत बुधवारपर्यंत म्हणणे मांडावे, असा आदेश मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाने मुख्यमंत्री कमलनाथ सरकारला दिला. राज्य सरकार आणि विधिमंडळ सचिवांसह अन्य संबंधितांवर नोटिसा बजावण्यात येतील, असे न्या. धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील पीठाने सांगितले.