‘त्या’ सुसाइड नोटवरून काँग्रेस-राष्ट्रवादीत जुंपणार?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – आज राज्यमंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. या बैठकीमध्ये अपक्ष खासदार मोहन डेलकर आत्महत्या प्रकरणावरून पडसाद उमटण्याची शक्यता आहे. या प्रकरणात गृह खात्याकडून वेगाने तपास होत नसल्याची तक्रार काँग्रेसकडून करण्यात येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनिल देशमुख यांच्याकडे गृह खात्याची जबाबदारी आहे. मोहन डेलकर प्रकरणात गृह खाते तपास करण्यात दिरंगाई करत असल्यामुळे आजच्या बैठकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यात जुंपण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Advt.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडणार आहे. या बैठकीत मोहन डेलकर आत्महत्या प्रकरणाचे पडसाद उमटण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मोहन डेलकर यांनी आत्महत्येपूर्वी एक सुसाइड नोट लिहिली होती. या नोटमध्ये डेलकर यांनी भाजपच्या काही बड्या नेत्यांच्या नावांचा उल्लेख केला आहे. असे असूनसुद्धा गृह खातं या प्रकरणाचा तपास वेगानं करत नसल्याची तक्रार काँग्रेसकडून करण्यात येत आहे. त्यामुळे आज होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत काँग्रेसकडून हा मुद्दा उपस्थित केला जाऊ शकतो.

काँग्रेसचा नेमका आक्षेप काय ?
सुशांतसिंह राजपूत, पूजा चव्हाण, मनसुख हिरेन यांच्या मृत्यू प्रकरणावरून भाजपकडून महाविकास आघाडीला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला जात आहे. अनेक प्रकरण उचलून धरत महाविकास आघाडी सरकारची प्रतिमा मलीन करण्याचे काम भाजपकडून करण्यात येत आहे. त्यामध्ये पालघर मॉब लिचिंग,पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण, मनसुख हिरेन यांच्या प्रकरणाचा समावेश आहे. मात्र, मोहन डेलकर यांनी आपल्या सुसाइड नोटमध्ये अनेक भाजप नेत्यांची नावे लिहिली असताना गृह खाते अत्यंत ढिलेपणाने काम करत असल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात येत आहे. यामुळे गृह खात्यावर दबाव वाढवण्याची रणनिती काँग्रेसकडून आखण्यात आली आहे.