काय सांगता ! होय, ‘या’ अधिकार्‍यानं चक्क मुलाचं नाव ठेवलं ‘काँग्रेस’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्या कार्यालयातील प्रसारमाध्यम अधिकारी विनोद जैन यांनी आपल्या मुलाचे नाव ‘काँग्रेस’ असे ठेवले आहे. विशेष म्हणजे या नवजात मुलाच्या जन्मदाखल्यावर देखील काँग्रेस जैन असे लिहिण्यात आले आहे. विनोद जैन आणि त्यांचे कुटुंबीय अनेक दशकांपासून काँग्रेसचे समर्थक आहेत.

विनोद जैन यांना वाटते की त्यांच्या येणाऱ्या पुढील पिढीने देखील त्यांच्या पावलांवर पाऊल टाकून चालावे. या कारणामुळे त्यांनी आपल्या मुलाचे नाव काँग्रेस पक्षाच्या नावावरून ठेवले आहे असं त्यांनी स्पष्ट केले.

या बाबत बोलताना विनोद जैन म्हणाले की, ‘माझ्या मुलाचे नाव काँग्रेस ठेवल्यामुळे माझ्या कुटुंबातील काही सदस्य नाराज झाले. परंतु मुलाचे नाव काँग्रेस ठेवण्यावर मी ठाम होतो. मी आधीपासूनच ठरवले होते की मला मुलगा झाला तर त्याचे नाव काँग्रेस ठेवणार. तसेच ते म्हणाले की माझ्या मुलाचा जन्म जुलै महिन्यात झाला, परंतु त्याचा जन्माचा दाखला मिळण्यास उशीर लागला. आता राज्य सरकारने माझ्या मुलाचा जन्माचा दाखला दिला असून त्यामध्ये मुलाचे नाव काँग्रेस जैन असे लिहिण्यात आले आहे.

‘तसेच जैन म्हणाले की, मुख्यमंत्री अशोक गहलोत माझे प्रेरणास्थान आहेत आणि मी त्यांच्यासोबत सदैव आहे. जेव्हा माझा मुलगा ‘काँग्रेस’ १८ वर्षाचा पूर्ण होईल तेव्हा तो आपली राजकीय कारकीर्द सुरु करेल असं देखील ते म्हणाले. काँग्रेस हा विनोद जैन यांचा दुसरा मुलगा असून त्यांना पहिली मुलगी आहे. विनोद जैन यांनी स्पष्ट केले की माझा मुलगा मोठा होऊन काँग्रेस पक्षात आपली सक्रिय भूमिका साकारेल त्यामुळेच त्याचे नाव काँग्रेस ठेवल्याचे त्यांनी सांगितले.

फेसबुक पेज लाईक करा –