सुशांतच्या प्रकरणावरून काँग्रेस-भाजपात जुंपली, चित्रपट निर्माता संदीप सिंहवरून राजकारण तापलं

पोलीसनामा ऑनलाईन टीम : अभिनेता सुशांत सिंह आत्महत्या प्रकरण सीबीआयकडे गेल्यापासून नवनवीन माहिती समोर येत आहे. अशातच या प्रकरणात ‘पीएम नरेंद्र मोदी’ चित्रपट निर्माते संदीप सिंह यांचं नाव समोर आल्याने सरकार आणि विरोधी पक्षात वाद निर्माण झाला आहे. तसेच संदीप यांचं भाजप सोबत कनेक्शन काय? असा सवाल काँग्रेसने उपस्थित केला आहे. त्यावरुन आता काँग्रेस विरुद्ध भाजप यांच्यात तू तू मै मै सुरु झाले आहे.

भाजपचे आमदार राम कदम यांनी या प्रकरणात उडी घेतली असून त्यांनी काँग्रेसचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. ते म्हणाले, काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी संदीप सिंह यांच्यावरून भाजप नेत्यांवर केलेलं आरोप बिनबुडाचे आहेत. जनतेची दिशाभूल करणारे आहेत. सुशांतसिंह प्रकरणी महाराष्ट्र पोलिसांनी ६५ दिवस तपास केला. त्यावेळी सरकारने संदीप सिंहची चौकशी का नाही केली.

गृहखातं देखील सरकारच्या ताब्यात आहे. मग तेव्हाच संदीप सिंहचं काय तर त्याच्या कुटूंबीयांची चौकशी करायला हवी होती. आणि आताही सरकारनं चौकशी केली तरी त्यांना कोण अडवत आहे. याचा अर्थ असा की, सरकारला कोणाची तरी पाठराखण करायची आहे. तसेच रियाचं आणि राज्य सरकारच काय नातं? रियाला तातडीने पोलिस संरक्षण देण्यात येत, पण सुशांतच्या नातेवाईकांना नाही. रियाला रेड कार्पेट सुविधा मिळत असल्याचा, आरोप यावेळी राम कदम यांनी केला.

सचिन सावंत यांनी काय म्हटलं होत ?
अभिनेत्री रिया चक्रवर्तीच्या चॅटवरुन ड्रग्ज प्रकरण समोर आल्यावर भाजपच्यावतीने सरकारवर निशाणा साधण्यात आला. त्यावरुन काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी संदीप सिंहचे फडणवीसांसोबतचे फोटो शेअर करुन, भाजपच्या अँगलवरुनही तपास करण्याची मागणी केलेली.

सचिन सावंतांना फडणवीसांचे प्रत्युत्तर…
देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांच्यावर निशाणा साधत संदीप सिंह हे बाळासाहेब ठाकरे यांच्यावर जो सिनेमा झाला त्याचे निर्माते असल्याचं म्हटलं. एखाद्या कार्यक्रमात माझा त्यांच्यासोबत फोटो असेल, तर त्यावरुन राजकारण कारण्यासारखं काही नाही, सचिन सावंत यांचा अभ्यास कमी पडतोय, अशा शब्दांत फडणवीस यांनी सावंत यांनी टोला लगावला.