नाना पटोलेंचा दावा, म्हणाले – ‘पुढील वेळी इंदापूरमध्ये काँग्रेसचा आमदार, अजित पवारांचं टेन्शन वाढलं’

इंदापूर : पोलीसनामा ऑनलाइन – पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीचा प्रचार संपवून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले गुरुवारी इंदापूरमध्ये आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना एक मोठे वक्तव्य केले आहे. 2024 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस महाराष्ट्रातील सर्वाधिक मोठा पक्ष असेल, असे राजकीय भाकित पटोले यांनी केले आहे. तसेच काँग्रेस हा सत्तेतील प्रमुख पक्ष असेल असा दावा देखील नाना पटोले यांनी केला आहे. नाना पटोले यांच्या दाव्यामुळे महाविकास आघडीबाबत चर्चांना उधाण आले आहे.

राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तीन पक्षांनी एकत्र येऊन महाविकास आघाडी स्थापन केली. सर्वाधिक जागा जिंकलेल्या भाजपला महाविकास आघाडीने सत्तेपासून दूर ठेवत सरकार स्थापन केले. मात्र, नाना पटोले यांनी इंदापूरमध्ये केलेल्या वक्तव्यामुळे भविष्यातील निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीचे काय होणार असा प्रश्न उपस्थित होत आहे. तसेच महाविकास आघाडीच्या भवितव्याबाबत वेगवेगळ्या चर्चा रंगू लागल्या आहेत. पत्रकारांशी बोलताना नाना पटोले यांनी भाजपवर टीका करताना काँग्रेसची शक्ती कशी वाढली हे सांगण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केले.

इंदापूरामध्ये काँग्रेसचा आमदार

इंदापूर मतदारसंघात राष्ट्रवादीचा आमदार असला तरी या मतदार संघात पुढच्या वेळी काँग्रेसचा आमदार असेल, असा दावा नाना पटोले यांनी केला आहे. इंदापूर तालुक्यामध्ये काँग्रेला मानणारा वर्ग मोठा आहे. गावागावामध्ये लोक काँग्रेसला मानतात. त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत इंदापूरमध्ये काँग्रेसचा आमदार असेल. तसेच जे कोणी काँग्रेसला मानणारे आहेत त्यांच्यासाठी पक्षात जागा खाली आहे. पण संधी साधूंसाठी काँग्रेस पक्षात जागा नाही. ज्यांना एक पक्ष म्हणून काम करायचे असेल त्यांच्यासाठी काँग्रेसची दारं उघडी आहेत. पण सत्तेसाठी नाही, असेही नाना पटोले म्हणाले.

लोकांनी भाजपचा करेक्ट कार्यक्रम केला

नाना पटोले यांनी यावेळी भाजपवर टीका करताना म्हटले की, भाजपचं सरकार सत्तेत असताना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये लोकांनीच त्यांचा करेक्ट कार्यक्रम केला आहे. खोटी आश्वासनं देणे आणि लोकांची दिशाभूल करणे एवढाच धंदा फडणवीस यांचा आहे. भाजप नेते सत्ताजीवी आहेत. ते सत्तेशिवाय राहू शकत नाहीत. तर नरेंद्र मोदी प्रचारजीवी पंतप्रधान आहेत. नागरिकांच्या जीवाची काळजी करण्याऐवजी ते प्रचार करत आहे. देशाने पहिल्यांदाच असा पंतप्रधान पाहिला असल्याची टीका पटोले यांनी केली.

अजित पवारांच टेन्शन वाढलं

दरम्यान, राज्यात तीन पक्षांची आघाडी असताना नाना पटोले यांनी सहकारी पक्षांना अप्रत्यक्ष संकेत दिले आहेत. काँग्रेस पक्ष महाराष्ट्रात कमकुवत पक्ष असल्याची टीका केली जात आहे. त्यामुळे नाना पटोले यांनी केलेले विधान हे भविष्यातील राजकारणाचे संकेत आहेत. असे असले तरी इंदापूरमध्ये पुढील आमदार काँग्रेसचा असेल असा दावा केल्याने अजित पवार आणि दत्तात्रय भरणे यांचे टेन्शन वाढले आहे.