‘बाळासाहेबांना जे मान्य नव्हते तेच उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पदासाठी केलं’

सातारा : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात भाजपसोबतची युती तोडून शिवसेनेने काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत मैत्री करुन राज्यात सरकार स्थापन केले. उद्धव ठाकरे स्वत: मुख्यमंत्री झाले. यावर निशाणा साधताना केंद्रीय मंत्री रामदास आठवले म्हणाले, बाळासाहेब ठाकरे यांना जे मान्य नव्हते तेच उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पद मिळवण्यासाठी केले. बाळासाहेब ठाकरे यांनी ज्या पक्षाला वारंवार विरोध केला त्या पक्षासोबत त्यांनी सत्ता स्थापन केली, अशी टीका केली आठवले यांनी केली.

केंद्रीय मंत्री रामदास आठवले हे दोन दिवसांपासून सातारा जिल्हा दौऱ्यावर होते. शनिवारी त्यांनी वाई व महाबळेश्वर येथे भेट दिली. आज (रविवार) ते सातारा येथे आले असताना पत्रकारांशी बोलत होते. यावेळी आरपीआयचे जिल्हा अध्यक्ष अशोक गायकवाड, अण्णा वायदंडे व कार्यकर्ते उपस्थित होते.

रामदास आठवले म्हणाले, काँग्रेस महाविकास आघाडीवर नाराज असल्याने सत्तेतून बाहेर पडेल आणि लवकरच भाजप महाराष्ट्रात सत्तेवर येईल असा दावा त्यांनी यावेळी केला. ते पुढे म्हणाले, हे सरकार किती दिवस राहील याबाबत आम्ही साशंक आहोत. काँग्रेसला सरकारमध्ये पाहिजे तेवेढा सन्मान मिळत नाही. त्यामुळे काँग्रेस आघाडी बरोबर किती दिवस राहणार हे सांगता येत नाही. काँग्रेसने पाठिंबा काढला तर हे महाविकास आघाडीचे सरकार पडले. त्यातच आघाडीच्या कारभारावर काँग्रेस नाराज असल्याचे दिसत असून त्यांनी पाठिंबा काढला तर सरकार पडू शकते, असे आठवले म्हणाले आठवले पुढे म्हणाले, राज्यात भाजपला सत्तेत येण्यासाठी 28 आमदारांची आवश्यकता आहे. निवडणूक टाळण्यासाठी राज्यातील अनेक आमदार भाजपच्या संपर्कात आहेत. त्यामुळे लवकरच देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यात भाजपचे सरकार येईल, असा दावा त्यांनी केला आहे.