शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत काँग्रेसच्या हायकमांडनं घेतला ‘हा’ निर्णय

नवी दिल्ली : वृत्त संस्था – महाराष्ट्रातील राजकीय हालचालींना प्रचंड वेग आला आहे. भाजपानं सत्तास्थापन करू शकत नाही असं राज्यपालांना सांगितल्यानंतर राज्यपालांनी दुसरा सर्वात मोठा पक्ष असलेल्या शिवसेनेला सत्तास्थापनेसाठी आज सायंकाळी 7.30 वाजेपर्यंतचा वेळ दिला आहे. शिवसेनेला पाठिंबा द्यायचा की नाही याबाबत दिल्लीमध्ये काँग्रेसच्या कोअर कमिटीची बैठक झाली.

बैठकीत काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी, नेते मल्लिकार्जुन खर्गे, अहमद पटेल आणि इतर कमिटीच्या सदस्यांनी चर्चा केली. आता काँग्रेसनं शिवसेनाला पाठिंबा देण्याचा निर्णय जवळपास निश्चित केला असल्याचं सुत्रांनी सांगितलं आहे. मात्र, काँग्रेस हायकमांडनं महाराष्ट्रातील सर्व ज्येष्ठ नेत्यांना दिल्लीला बोलावलं असून त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत अंतिम निर्णय घेण्यात येणार असल्याचं काँग्रेसचे नेते मल्लिकार्जून खर्गे यांनी सांगितले आहे.

शिवसेनेकडून सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. नेते संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेवुन शिवसेनेचाच मुख्यमंत्री होईल आणि आम्ही कुठल्याही परिस्थितीत राज्यात राष्ट्रपती राजवट लागु देणार नाही असं स्पष्ट केलं आहे. दरम्यान, राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी आत्तापर्यंत कुठलाही निर्णय झालेला नाही असं स्पष्ट केलं आहे. काँग्रेसच्या निर्णयानंतर काही तासातच राष्ट्रवादी काँग्रेस त्यांचा निर्णय घेईल असं सांगितलं जातंय.

काँग्रेसनं आज दुपारी 4 वाजता शिवसेनेला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला तर राज्यात वेगळी समीकरण अस्तित्वात येणार आहेत. झारखंड आणि इतर राज्यातील निवडणुकांना काँग्रेसला समोर जायचं आहे. तेथील परिस्थिती हाताळण्यासंदर्भात काँग्रेस नेमका काय निर्णय घेईल हे आगामी काळात ठरेलच. शिवसेना एनडीएमधून बाहेर पडल्याचं आजा जवळपास स्पष्ट झालं आहे. आज सकाळीच शिवसेनेचे केंद्रीय मंत्री अरविंद सावंत यांनी आपण मंत्रीपदाचा राजीनामा देणार असल्याचं सांगितलं होतं. आता मुख्यमंत्री कोण या प्रश्नाचे उत्तर लवकरच मिळणार आहे.

आज दुपारी 4 वाजल्यानंतर काँग्रेस अंतिम निर्णय घेणार आहे. त्यानंतरच महाराष्ट्रातील सत्तास्थापनेचं चित्र स्पष्ट होणार आहे. दरम्यान, काँग्रेसनं शिवसेनेला पाठिंबा देण्याचे ठरविल्याची माहिती विश्वसनीय सुत्रांनी दिली आहे.

Visit : Policenama.com