‘काँग्रेस डॉ. बाबासाहेबांचे नाव इतिहासातून मिटवून टाकेल’ : पंतप्रधान नरेंद्र मोदी

वर्धा : पोलीसनामा ऑनलाईन – काँग्रेसला शक्य झाले तर ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव इतिहासातून मिटवून टाकतील असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर अतिशय बोचऱ्या शब्दात टीका केली आहे. वर्धा येथील लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या प्रचार सभेत ते बोलत होते. इतकेच नाही तर यावेळी बोलताना त्यांनी काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीवरही सडकून टीका करत निशाणा साधला.

प्रचार सभेत बोलताना मोदी म्हणाले की, “डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव काँग्रेस केवळ घ्यायचे म्हणून घेत आहे. काँग्रेसला शक्य झाले तर ते बाबासाहेबांचं नाव इतिहासातून मिटवून टाकतील. विदर्भातच काँग्रेसने बाबासाहेबांचा अपमान केला होता.” असे म्हणत मोदींनी काँग्रेसवर घणाघाती टीका केली.

पुढे बोलताना मोदी म्हणाले की, “स्वच्छता मोहिमांचा अपमान करून काँग्रेस स्वच्छतादूतांचा अपमान करत आहे. अशांना आता शिक्षा मिळायला हवी. काँग्रेसने शेतकऱ्यांना आणि गरिबांना केवळ लुटण्याचे काम केले आहे. पैशांसाठी यांनी अनेक घोटाळे केले आहे. काँग्रेसमुळेच देशातील गरिब हा गरिब राहिला आहे.” असे म्हणत मोदींनी काँग्रेसवर टीकेचे ताषेरे ओढले. शिवाय यावेळीही भाजपाला निवडून देण्याचे आवाहन मोदींनी केले.

दरम्यान, गेल्या लोकसभा निवडणुकीतही मोदींनी प्रचाराचा नारळ वर्ध्यातच फोडला होता. महत्त्वाचे म्हणजे येत्या 11 एप्रिलला विदर्भातील 7 जागांवर मतदान होत आहे. मुख्य म्हणजे मोदी 3 एप्रिलला गोंदियात सभा घेणार आहेत.