काँग्रेस अर्णब गोस्वामींविरोधात प्रत्येक पोलिस ठाण्यात देशद्रोहाचा गुन्हा नोंदवणार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – भारतीय लष्कराच्या कारवाईबाबतची संवेदनशील माहिती अर्णब गोस्वामी यांच्याकडे तीन आधीच कशी पोहचली ? अर्णब आणि पार्थोदास गुप्तासोबत केलेल्या संवादातून बालाकोटच्या लष्करी कारवाई तसेच पुलवामाच्या दहशतवादी हल्ल्या बाबतचा देखील संवाद समोर आला आहे. याविरोधात केंद्र सरकार काहीच पाऊल उचलत नसल्याने रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामींच्या विरोधात काँग्रेसने (congress) आक्रमक भूमिका घेत मोठा निर्णय घेतला आहे.

मुंबईतील काँग्रेस कार्यकर्ते, नेते मुंबईतील सर्व पोलीस ठाण्यामध्ये रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामींच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करणार आहेत. तसेच अर्णब यांच्या अटकेची मागणी केली जाणार आहे. मुंबई काँग्रेसचे नवनियुक्त अध्यक्ष भाई जगताप यांनी शनिवारी (दि.23) काँग्रेस कार्यकर्त्यांच्या बैठकीत ही घोषणा केली.

भाई जगताप यांनी सांगितले की, अर्णब गोस्वामी यांनी मुंबई पोलिसांपासून वाचण्यासाठी दिल्लीमध्ये बस्तान हलवले आहे. जर मुंबईच्या प्रत्येक पोलीस ठाण्यात देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला तर मुंबई पोलिसांवर त्यांना दिल्लीतून अटक करुन आणण्यासाठी दबाव वाढेल. सोमवार पासून गोस्वामी विरोधात गुन्हे दाखल करण्यास सुरुवात करण्यात येणार आहे. मी स्वत: आणि कार्याध्यक्ष चरणजीत सिंह सोमवारी आझाद मैदान पोलीस ठाण्यात गोस्वामींविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करणार असल्याचे जगताप यांनी सांगितले.

माझी मुंबई, माझी काँग्रेस मोहिम सुरु करणार

मुंबई काँग्रेसचे नवनियुक्त अध्यक्ष भाई जगताप यांनी मुंबई आगामी मुंबई महापालिका निवडणुक स्वबळावर लढणार असल्याची घोषणा पुन्हा एकदा केली आहे. यासाठी माझी मुंबई, माझी काँग्रेस मोहिम सुरु करणार असल्याचे सांगितले. ही मोहिम 100 दिवसांची असणार असून मुंबईतील प्रत्येक जिल्ह्यात महिन्याला एक दिवस जनता दरबार भरवला जाणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. या जनता दरबारमध्ये काँग्रेसचे सर्व मंत्री हजर राहून नागरिकांचे प्रश्न सोडवतील असे देखील जगताप यांनी सांगितले.