पुण्यात उमेदवाराविना काँग्रेस आज प्रचाराचा नारळ फोडणार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पक्षाचा उमेदवार ठरो वा ना ठरो लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा प्रारंभ करण्याचे काँग्रेस पक्षाने ठरविले असून आज शुक्रवारी चार वाजता ग्रामदैवत श्री कसबा गणपती मंदिरापासून प्रचाराची सुरुवात केली जाणार आहे.

काँग्रेस पक्षाच्या उमेदवारीबाबत उत्सुकता असल्याने गुरुवारी रात्री उशिरापर्यंत नेते, पदाधिकारी घोषणेची वाट पहात होते. पण, घोषणा झाली नाही. त्यानंतर आज सकाळी पक्ष पदाधिकाऱ्यांनी प्रचाराला सुरुवात करण्याचा निर्णय घेतला आणि प्रसारमाध्यमांना तसा निरोपही पाठविण्यात आला. उमेदवारीच्या स्पर्धेतील इच्छुक अरविंद शिंदे यांनी प्रचाराच्या दृष्टीकोनातून भेटीगाठी चालू केल्या आहेत. वरिष्ठ नेत्यांनी उमेदवारीचे संकेत दिल्यावर शिंदे अधिक सक्रीय झाले आहेत. उमेदवारीच्या रिंगणातून प्रवीण गायकवाड यांनी माघार घेतली आहे, माजी शहराध्यक्ष अभय छाजेड हे सुध्दा अलिप्त आहेत. उमेदवारीची अधिकृत घोषणा झाली नसल्याने मोहन जोशीसमर्थक अद्याप आशा बाळगून आहेत.

दरम्यान, पक्ष पातळीवर शहराध्यक्ष रमेश बागवे यांनी प्रचाराची तयारी केली आहे. दोन दिवसांपूर्वी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची काँग्रेस भवनात एकत्रित बैठक झाली. वेगवेगळ्या आघाड्यांच्या बैठका घेण्यात आल्या. विधानसभा मतदारसंघनिहाय बैठकाही आयोजित करण्यात आल्या आहेत. काँग्रेस भवनात निवडणूक मध्यवर्ती कचेरीचा मांडव घालण्यात आला आहे. सन २००९मध्ये कलमाडी यांच्या उमेदवारी च्या घोषणेस असाच विलंब झाला होता. तेव्हाही उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच पक्षाने कसबा गणपती मंदिरापासून प्रचाराला सुरुवात केली होती. त्याचीच पुनरावृत्ती आता होत आहे.