…तर काँग्रेस सचिन पायलट यांच्यावर कारवाई करणार

पोलीसनामा ऑनलाईन टीम – राजस्थानचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री सचिन पायलट पक्षावर नाराज आहेत. मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्यासोबत असलेल्या मतभेदांमुळे सचिन पायलट काँग्रेसपासून दूर जाण्याच्या भूमिकेत आहे. त्यामुळे काँग्रेसला आणखी एक हादरा बसण्याची शक्यता आहे. काँग्रेस विधिमंडळ पक्षाची बैठक आज आयोजित केली आहे. या बैठकीत सचिन पायलट सहभागी होणार नसल्याची माहिती आहे. पायलट विधिमंडळ पक्षाच्या बैठकीस उपस्थित न राहिल्यास पक्ष शिस्तभंगाची कारवाई करण्याची शक्यता आहे.

राजस्थानमध्ये काँग्रेसला काठावरचे बहुमत आहे. अशातच काँग्रेसकडे असलेल्या आमदारांपैकी जवळपास 30 आमदार हे पायलट गटाचे असल्याची माहिती आहे. त्यामुळे सचिन पायलट यांनी वेगळी भूमिका घेतल्यास काँग्रेस सरकार कोलमडणार हे निश्चित आहे. सचिन पायलट हे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांची भेट घेणार असल्याची चर्चा रंगत होती. मात्र आज ही भेट होणार नसल्याची माहिती आहे. कारण सध्या भाजप वेट अँड वॉचच्या भूमिकेत असल्याचे पाहायला मिळत आहे. काँग्रेसच्या विधीमंडळ पक्षाची आज महत्त्वपूर्ण बैठक होत असून या बैठकीनंतर भाजप पावले उचलणार असल्याची माहिती आहे. मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी काल दिवसभरात अनेकदा राष्ट्रीय संघटना महासचिव केसी वेणुगोपाल, वरिष्ठ नेता अहमद पटेल आणि राष्ट्रीय महासचिव अविनाथ पांडे यांच्याशी चर्चा केली. गहलोत यांच्याशी चर्चा झाल्यानंतर पांडे यांनी पायलट यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला मात्र संभाषण होऊ शकले नाही.