राहुल गांधींना पंतप्रधान करण्यासाठी काँग्रेस प्रयत्न करणार : खरगे

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

पंतप्रधानपदाच्या उमेदवाराचे नाव आधीच जाहीर करण्याची आवश्यकता नाही. लोकसभा निवडणुकीनंतर पंतप्रधान कोण ते ठरविले जाईल, अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार मांडली होती. त्यांच्या या वक्तव्यानंतर काँग्रेसने आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. काँग्रेसचे राज्याचे प्रभारी मल्लिकार्जुन खरगे यांनी यासंदर्भात म्हटले की, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी पंतप्रधान व्हावेत, यासाठी लोकसभा निवडणुकीत जास्तीत जास्त जागा जिंकून आणण्याचा पक्षाचा प्रयत्न राहील.

[amazon_link asins=’B0756Z43QS,B0784BZ5VY’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’3acaf276-ab42-11e8-86e8-bde4118ebf66′]

सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसची निणुकीच्या तयारीसाठी बैठक झाली होती. त्यानंतर पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी काँग्रेस व अन्य भाजपविरोधी पक्षांच्या आघाडीचे सूत्र मांडले. राष्ट्रीयस्तरावर आघाडी न करता, राज्या-राज्यांमध्ये भाजपविरोधी पक्षांची आघाडी करावी, निवडणुकीनंतर पंतप्रधान ठरवावा, त्यासाठी आधी कुणाचे नाव जाहीर करण्याची गरज नाही, असे पवार यांनी म्हटले होते. खरगे यांनी  त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हटले की, ही शरद पवार यांची भूमिका आहे, राहुल गांधी हे पंतप्रधान व्हावेत ही काँग्रेसची इच्छा आहे, त्यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत. ते त्यांचे मत आहे. परंतु आमचा पक्ष सत्तेवर यावा, राहुल गांधी पंतप्रधान व्हावेत, असे आम्हाला वाटते, त्यासाठी जास्तीत जास्त जागा निवडून आणण्याचा प्रयत्न राहील, असे खरगे म्हणाले.

मंगळवारी आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी दादर येथील टिळक भवनात काँग्रेसचे प्रदेश पदाधिकारी आणि वरिष्ठ नेत्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, शिवाजीराव पाटील-निलंगेकर, राधाकृष्ण विखे-पाटील, बाळासाहेब थोरात आदी नेते उपस्थित होते. आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीसाठी समविचारी पक्षांबरोबर युती करणे, राज्यातील सध्याची राजकीय-सामाजिक परिस्थिती, जागावाटप यावर प्रदीर्घ चर्चा झाली. दरम्यान, आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात ५०-५० टक्के जागांचे वाटप व्हावे, अशी चर्चा आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसकडून अद्याप तसा कोणताही प्रस्ताव आला नसल्याचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी सांगितले.

प्रत्येक जिल्ह्यांत काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद आहेत. त्याचा निवडणुकीत पक्षाला फटका बसू शकतो. त्यामुळे काही बड्या नेत्यांमधील वाद मिटविण्यासाठी खरगे यांनी पुढाकार घेतला आहे. त्यानुसार अहमदनगरमधील राधाकृष्ण विखे-पाटील आणि बाळासाहेब थोरात या दोन नेत्यांमधील वाद मिटविण्यासाठी स्वतंत्र बैठक घेण्यात आल्याचे सुत्रांनी सांगितले. धुळे जिल्ह्यातही माजी मंत्री रोहीदास पाटील व अमरीश पटेल यांच्यातील वाद मिटविण्याचाही प्रयत्न झाल्याचे सुत्रांनी सांगितले.

राज यांचे उद्धव ठाकरेंना पत्र, ईव्हीएम हटावच्या मागणीला पाठींबा देण्याचे आवाहन