महाराष्ट्रातील ‘त्या’ उमेदवाराची उमेदवारी काँग्रेस मागे घेणार ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – सिंधुदुर्ग रत्नागिरी मतदारसंघासाठी काँग्रेसने उमेदवारी जाहीर केलेले नविनचंद्र बांदिवडेकर यांची उमेदवारी मागे घेतली जाण्याची शक्यता आहे. जितेंद्र आव्हाड यांनी नविनचंद्र बांदिवडेकर यांचा सनातनच्या व्यासपीठावरचा फोटो ट्विटरवर पोस्ट करून काँग्रेसने त्यांची उमेदवारीवर विचार करावा असे म्हणले होते. त्यावर सध्या काँग्रेसमध्ये फेरविचार सुरू आहे असे सूत्रांनी सांगितले आहे.

सनातन संस्थेवर नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे, गौरी लंकेश यांच्या हत्या घडवल्याचे आरोप होतात. अशा हिंदुत्ववादी संस्थेशी संबंधित असणाऱ्या व्यक्तीला काँग्रेसने तिकीट देणे योग्य नाही. तसेच हे काँग्रेसच्या विचारधारेला शोभणारे नाही असे जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत. एका मराठी वृत्तवाहिनीवर त्यांनी सिंधुदुर्ग रत्नागिरी मतदारसंघाचा उमेदवार बदलण्याची मागणी केली आहे.

यावर अशोक चव्हाण यांनी देखील ट्विट करून आपली प्रतिक्रिया दिली आहे. “रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस उमेदवार नविनचंद्र बांदिवडेकर यांचे सनातन संस्थेशी संबंध असल्याचे वृत्त काही वाहिन्यांनी दिले आहे. काँग्रेस सनातनसारख्या कट्टरतावादी विचारांच्या विरोधात आहे. या प्रकरणी सखोल चौकशी करून पक्ष त्यांच्या उमेदवारीबाबत योग्य निर्णय घेईल” असे अशोक चव्हाणयांनी आपल्या ट्विटमध्ये म्हणाले आहे. तर नविनचंद्र बांदिवडेकर यांची उमेदवारी मागे घेऊन रमेश कीर यांना सिंधुदुर्ग रत्नागिरी मतदारसंघातून उमेदवारी देण्याचे काँग्रेसने ठरवले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.