CAA वरून महाआघाडीत उभी फूट, विरोधकांच्या बैठकीपुर्वीच शिवसेनेनं घेतला मोठा निर्णय

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशात सीएए कायदा लागू झाल्यानंतर अनेक राज्यांमध्ये याला विरोध झाला. तसेच काही ठिकाणी हिंसाचाराच्या घटना घडल्या. नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात आज (सोमवार) दिल्लीमध्ये विरोधी पक्षांची एक बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीत सीएए आणि एनआरसी लागू करण्यापासून रोखण्यासाठी रणनिती तयार करण्यात येणार आहे. काँग्रेसने बोलावलेल्या या बैठकीला पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सहभागी होणार नसल्याचे जाहीर केले आहे. तसेच मायावती यांनी देखील बैठकीला उपस्थित राहणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.

त्यामुळे सीएए आणि एनआरसीला विरोध करणाऱ्या विरोधी पक्षांमध्येच फूट पडल्याचे पहायला मिळत आहे.महाराष्ट्रात आघाडीच्या पाठिंब्याने सत्ता स्थापन केलेल्या शिवसेनेने देखील या बैठकीला पाठ फिरवली असल्याची माहिती सुत्रांकडून देण्यात येत आहे. शिवसेनेला या बैठकीचे आमंत्रणच देण्यात आले नसल्याची चर्चा आहे. त्यामुळे शिवसेनेकडून कोणीही दिल्लीला बैठकीसाठी जाणार नसल्याची माहिती मिळत आहे.समान विचारांच्या विरोधी पक्षांच्या बैठकीमध्ये सीएए आणि एनआरसी मुद्यावर सविस्तर चर्चा होऊ शकते.

हा कायदा लागू होण्यापासून रोखण्यासाठी रणनितीवर विचार केला जाईल. तसेच विरोधकांकडून मोदी सरकारला संसदेच्या आगामी अर्थसंकल्पाच्या अधिवेशनात घेरण्याबाबत चर्चा करतील. या बैठकीनंतर काँग्रेस जनसंपर्क मोहिमेचे स्वरूप जाहीर करू शकते, असे सांगण्यात येत आहे. दरम्यान, पश्चिम बंगालमध्ये काँग्रेस आणि कट्टर पंथी खालच्या पातळीवर राजकारण करत असल्याचा आरोप ममता बॅनर्जी यांनी केला आहे. त्यामुळे स्वत: च्या जीवावर दोन्ही कायद्यांना विरोध करणार असल्याचे ममता बॅनर्जी यांनी स्पष्ट केले आहे. तर काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी ममता बॅनर्जी यांना बैठकीसाठी निमंत्रण दिले आहे. मात्र, यायचे कि नाही हे त्यांच्यावर अवलंबून असल्याचे म्हटले आहे. तर बसपाच्या मायावती यांनी देखील बैठकीला उपस्थित राहणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/