रिकाम्या खुर्च्यांचे फोटो काढणाऱ्या फोटोग्राफरला काँग्रेस कार्यकर्त्यांकडून मारहाण

चेन्नई : वृत्तसंस्था – तामिळनाडूतील विरुद्धुनगर जिल्ह्यात शनिवारी रात्री काँग्रेस पक्षाकडून एका प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेला लोकांनी हजेरी लावली नसल्याने त्या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या खुर्च्या रिकाम्या होत्या. हे पाहून एका छायाचित्रकार रिकाम्या खुर्च्यांचे फोटो काढले. हे पाहून संतापलेल्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी त्या छायाचित्रकाराला जबर मारहाण केली. या मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

तामिळनाडू काँग्रेसचे अध्यक्ष के.एस. अलागिरी यांची विरुद्धुनगर येथे सभा होती. या सभेला मोठ्या प्रमाणात गर्दी होईल अशी अपेक्षा आयोजकांना होती. त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात खुर्च्या मांडण्यात आल्या होत्या. मात्र या सभेकडे नागरिकांनी पाठ फिरवल्याने पटांगणातील बऱ्याच खुर्च्या रिकाम्या होत्या. त्याचवेळी एका तामिळ साप्ताहिकामध्ये काम करणारे छायाचित्रकार आर. एम. मुथुराज या सभेचे वृत्तांकन करण्यासाठी तिथे आले होते. खुर्च्या रिकाम्या पाहून त्यांनी त्याचे फोटो कढणे सुरू केले. हे पाहताच या ठिकाणी उपस्थित असणारे काँग्रेस पक्षाच्या कर्यकर्त्यांनी मथुराज यांच्यावर भडकले.

त्यांनी मुथुराज यांच्याकडी कॅमेरा हिसकावण्याचा प्रयत्न केला. मात्र, मथुराज यांनी कॅमेरा दिला नाही. त्यामुळे संतापलेल्या कार्यकर्त्यांनी त्यांना मारहाण केली. दरम्यान, या ठिकाणी उपस्थित असलेल्या इतर पत्रकारांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी कार्यकर्त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. तर काही लोक मारहाणीचा व्हिडीओ शुट करत होते. हाच व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दरम्यान काँग्रेस कार्यकर्त्यांच्या जबर मारहाणीनंतर मुथुराज यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.