राजकारणातील घराणेशाहीला दर ५ वर्षांनी द्यावी लागते परीक्षा : डॉ. सत्यजीत तांबे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – राजकीय नेत्यांवर आणि घराण्यांवर नेहमी घराणेशाहीचा आरोप होत असतो. मात्र, दर ५ वर्षांनी राजकारणातील घराणेशाहीला परीक्षा द्यावी लागते. त्यांना लोकांमध्ये जाऊन जनमतं घ्यावं लागतं, घराणेशाहीची परीक्षा ही फक्त राजकारणातच होते, इतर कोणत्या क्षेत्रात होत नाही असं मत महाराष्ट्र युवक काँगेसचे प्रदेशाध्यक्ष डॉ. सत्यजीत तांबे यांनी मांडले आहे. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी राजकारणातील घराणेशाहीवर आपले मत व्यक्त केले आहे.

राजकारणात तरुण नेतृत्व असले पाहिजे हे राजकीय नेते म्हणत असतात. त्यावर कोणा सर्वसामान्य मुलांना संधी न देता नेत्यांच्याच मुलांना ही संधी का दिली जाते, असा सवाल तांबे यांना करण्यात आला होता. त्यावर त्यांनी अधिक सुचक उत्तर दिले. अभिनेत्याचा मुलगा अभिनेता होता, उद्योगपतीचा मुलगा उद्योगपती होतो. वकीलाचा मुलगा वकील होतो, डॉक्टरचा मुलगा डॉक्टर होतो. आज कोणतंही क्षेत्र घेतलं तरी घराणेशाही लांब राहू शकत नाही, वारसाने किंवा घराणेशाहीने तुम्हाला संधी मिळते मात्र, तुमचं कर्तृत्व तुम्हालाच सिद्ध करावं लागतं, असं त्यांनी सांगितलं. तसंच राजकारणी आणि त्यांच्या मुलांमध्ये असलेल्या कर्तृत्वावरूनही त्यांनी आपले मत मांडले.

राजकारणात अनेक मोठे नेते आहेत मात्र, त्यांची मुलं राजकारणात काही करू शकली नाहीत अशी उदाहरणे आहेत. तुम्हाला संधी मिळते तेव्हा तुम्ही त्याचा वापर कसा करता यावर तुमचं भवितव्य अवलंबून असते, असं त्यांनी म्हटलं.

स्वकर्तृत्व सिद्ध करण्यासाठी प्रत्येकाला संघर्ष करावा लागतो. त्यामुळे घराणेशाहीमुळे कोणी राजकारणात येत नसेल तर त्यांनी गैरसमज दूर करावा. तुमच्यात कर्तृत्व असेल नक्कीच राजकारणात या, असं आवाहन डॉ. सत्यजीत तांबे यांनी राजकारणातील तरूणांना केलं आहे.

तसेच राजकारणातील अनेक नेत्यांची मुलं उच्चशिक्षित आहेत. शिवाय वेगवेगळ्या क्षेत्रात काम करतात. बाकी क्षेत्रातील घराणेशाहीला परीक्षा नसते तर राजकारणातील घराणेशाहीला दर ५ वर्षांनी परीक्षा द्यावी लागते. लोकांना सामोरे जावं लागते, जनमत घ्यावे लागते, असे दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख नेहमी सांगायचे, असंही त्यांनी यावेळी सांगितलं.