कार्यशैलीला तंत्रज्ञानाची जोड द्यावी : पालकमंत्री गिरीश बापट

पुणे : पोलिसनामा ऑनलाईन – प्रशासकीय कामकाज अधिक गतिमान व कार्यक्षम होण्यासाठी आपल्या कार्यशैलीला तंत्रज्ञानाची जोड देणे आवश्यक असल्याचे मत अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक सरंक्षण, अन्न व औषध प्रशासन, संसदीय कार्य मंत्री तथा पुणे जिल्हयाचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी व्यक्त केले.

येथील जिल्हाधिकारी कार्यालयात गृहशाखा ऑनलाईन प्रणाली उद्घाटन, उत्कृष्ट अधिकारी, कर्मचारी यांचा गुणगौरव व जिल्हा नियोजन समिती नावीन्यपूर्ण योजनेंतर्गत तलाठ्यांना लॅपटॉप वितरण समारंभ कार्यक्रम पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते झाला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी नवल किशोर राम, अपर जिल्हाधिकारी रमेश काळे, उपजिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख, निवासी उप जिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे, ई फेरफार प्रकल्प समन्वयक रामदास जगताप, जिल्हा नियोजन अधिकारी प्रमोद केंभावी आदी उपस्थित होते.

बापट म्हणाले की, प्रशासकीय कामामध्ये चांगले काम करणाऱ्या अधिकारी, कर्मचारी यांच्या कामाचे कौतुक हे केलेच पाहिजे. आपण अनेक चांगली कामे केलेली आहेत. आपल्या कार्यालयाची प्रतिमा चांगली ठेवण्यासाठी प्रत्येकाने जबाबदारी ओळखून काम केले पाहिजे. सर्वांनी नवीन तंत्रज्ञान आत्मसात केले पाहिजे. आधुनिकीकरणाचा फायदा करुन घेतला पाहिजे. कार्यालयात येणाऱ्या प्रत्येक नागरिकाची मानसिकता ओळखून त्यास सन्मानाची वागणूक देऊन काम करा. यावर कार्यालयाची प्रतिमा अवलंबून असते. आपणास काम करण्यास लागणाऱ्या साहित्याची पूर्तता केली जाईल. आपण अशीच चांगली सेवा द्यावी, अशी अपेक्षा व्यक्त करुन शुभेच्छा दिल्या.

जिल्हाधिकारी नवल किशोर राम म्हणाले की, शासनासाठी महसूल विभाग हा महत्त्वाचा असून पुणे जिल्हा हा सातबारा संगणकीकरणाच्या कामात पुढे आहे. महसूल विभागातील अधिकारी, कर्मचारी हे नेहमी आपले काम वेळेत पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असतात. महसूल विभागात आपली भूमिका महत्त्वाची असून आपणावर कितीही ताणतणाव असला तरी आपण आपली मानसिकता सकारात्मक ठेवून प्रत्येक नागरिकासोबत चांगले वागणे गरजेचे आहे. यापुढेही आपण अधिक चांगले काम करुन दाखवू, असेही ते शेवटी म्हणाले.

यावेळी पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते एकूण ३९ गुणवंत कर्मचारी यांचा प्रशस्तीपत्रक देवून सन्मान केला तर एकूण १६ तलाठी कर्मचाऱ्यांना लॅपटॉपचे वितरण करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक अपर जिल्हाधिकारी रमेश काळे यांनी तर निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे यांनी उपस्थितांचे आभार मानले. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयाचे अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like