‘कोरोना’ रूग्णांवर उपचार करणार्‍या डॉक्टरांसाठी दिलासा ! SC नं केंद्र सरकारला सांगितलं – ‘क्वारंटाईनचा कालावधी ‘ऑन डयूटी’ मानला जाणार’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  कोरोनाचे उपचार करत असलेल्या डॉक्टरांना अधिक चांगल्या सुविधा देण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात आज सुनावणी झाली. आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे की, कोरोनाचे उपचार करत असलेल्या डॉक्टरांचा क्वारंटाइन कालावधी आता रजेवर नाही तर ‘ऑन ड्युटी’ मानला जाईल. केंद्राने कोर्टाला सांगितले की, ६ ऑगस्ट रोजी सर्व राज्यांना सूचना देण्यात आल्या आहेत.

याचिकाकर्त्याने मागील सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाला सांगितले होते की, बर्‍याच ठिकाणी डॉक्टर/ आरोग्य कर्मचाऱ्यांचा क्वारंटाइन कालावधी सुट्टी म्हणून मोजला जात आहे. त्याला चुकीचे म्हणत कोर्टाने सरकारकडे जाब विचारला होता. युनायटेड रेसिडेन्ट अँड डॉक्टर असोसिएशनने (यूआरडीए) दाखल केलेल्या याचिकेत दिल्ली, महाराष्ट्र, पंजाब, त्रिपुरा आणि कर्नाटकमधील आरोग्य कर्मचाऱ्यांना पगार दिला जात नसल्याची माहितीही कोर्टाला दिली होती. यावर कोर्टाने त्वरित पैसे भरण्याचा आदेश दिला होता.

सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी केंद्र सरकारतर्फे बाजू मांडताना तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाला सांगितले होते की, डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचार्‍यांना त्यांची ड्युटी झाल्यावर सक्तीने क्वारंटाईनमध्ये पाठवले जाते. यावर खंडपीठाने विचारले की, असे का होत आहे? त्याला उत्तर देताना एसजी म्हणाले की, याबतात प्रयत्न केला जाईल कि डॉक्टरांच्या क्वारंटाईन कालावधीला ऑन ड्युटी मानले जावे.