‘मनसे’च्या इशाऱ्यानंतर दुचाकी खरेदीदारांना देखील दिलासा ! 6 महिन्यांसाठी ‘बाऊंसेस चार्ज’ माफ

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमुळं आर्थिक संकटात सापडलेल्या कर्जधारकांना दिलासा मिळाला आहे. मनसेच्या इशाऱ्यानंतर बजाज फायनान्सनं 1,19,743 रिक्षा कर्ज ग्राहकांना आर्थिक दिलासा दिला होता. यानंतर आता मनबा फायनान्स या दुचाकी खरेदीसाठी कर्ज देणाऱ्या वित्तीय संस्थेनं मनसेच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देऊन 6 महिन्यांसाठी बाऊंसिंग चार्जेस (मासिक प्रत्येकी 826 रुपये) माफ केले आहेत.

लॉकडाऊनच्या काळात रिक्षा मालकांना 5 महिने कोणत्याही प्रकारचे आर्थिक उत्पन्न मिळत नव्हते. अशा स्थितीत रिक्षांसाठी घेतलेल्या कर्जाचे मासिक हप्ते भरण्यासाठी त्यांच्यावर दबाव टाकला जात होता. अशा अनेक तक्रारी महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेकडे आल्या होत्या. मनसेनं यासंदर्भात बजाज कंपनीकडून रिक्षा कर्ज ग्राहकांना सहकार्य करावं यासाठी आधी बजाज कंपनीसोबत पत्रव्यवहार केला. नंतर गोरेगाव येथील बजाज फायनान्सच्या कार्यालयावर धडक देऊन रोखठोक इशारा दिला. यानंतर बजाज फायनान्सचे वरिष्ठ अधिकारी आणि मनसेचे संजय नाईक, कीर्तीकुमार शिंदे यांच्यात चर्चेच्या दोन फेऱ्या झाल्या. या चर्चेत मनसेनं सुचवलेली योजना बजाज फायनान्सनं मान्य केली. सोमवारी सायंकाळी उशीरा कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी योजनेचे लेखी पत्र मनसेला दिले. यानंतर आज मनबा फायनान्सनंही दुचाकीधारकांना दिलासा देत हप्त्यात सवलत दिली.

मनबा फायनान्स या दुचाकी खरेदीसाठी कर्ज देणाऱ्या वित्तीय संस्थेनं मनसेच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देऊन 6 महिन्यांसाठी बाऊंसिंग चार्जेस (मासिक प्रत्येकी 826 रुपये) माफ केले आहेत. एकूण 12843 ग्राहकांना (6 महिन्यांसाठी प्रत्येकी 4956 रुपये) याचा लाभ मिळणार आहे. दुचाकीस्वारांना होणारा एकूण लाभ सुमारे 6,36,49,908 एवढा आहे.