मोदींची मंदिराला भेट, कर्नाटकातील मतदारांना भुलवण्याचे षडयंत्र

वृत्तसंस्था :

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या नेपाळ दौऱ्यावर आहेत. आज (शनिवार) त्यांच्या दौऱ्याचा शेवटचा दिवस आहे. आज सकाळी त्यांनी मुक्तिनाथ मंदिरामध्ये विधिवत पुजा केली. त्याचबरोबर मंदिराच्या पुजाऱ्याच्या हातात कलावा देखील बांधला. दरम्यान, जमिनीवर बसून पूजेचे सर्व नियमही पाळतानाही ते दिसले होते. त्यांचे नेपाळच्या मंदिरामधील फोटो सर्वत्र व्हायरल होत आहेत. आता त्यावरून काँग्रेसचे राष्ट्रीय महासचिव अशोक गहलोत यांनी मोदींवर टीका केली आहे. ते म्हणाले, मोदी हे दाखवण्याचा प्रयत्न करीत आहेत की तेच खरे हिंदू आहेत. मोदी मंदिरांमध्ये जाऊन मतदारांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करीत आहेत, असे करण्याचे ते नाटक करीत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

गहलोत म्हणाले की, कर्नाटकात सध्या आदर्श आचारसंहिता लागू आहे. त्यामुळेच मोदी मतदारांची थेट कर्नाटकात भेट न घेता, नेपाळमधील प्रसिद्ध हिंदू मंदिरांना भेटी देऊन मतदारांना भुलवण्यासाठी तिथे पुजा अर्चा करण्याचे ढोंग करीत आहेत. लोकशाहीसाठी असली प्रवृत्ती चांगली नाही. मोदींनी आजचाच दिवस यासाठी का निवडला? असा सवालही त्यांनी यावेळी केला.

नेपाळच्या मुक्तिनाथ मंदिरात दर्शन घेणारे मोदी हे भारताचे पहिले पंतप्रधान आहेत. मुक्तिनाथ येथे पुजा केल्यानंतर ते पशुपतिनाथ मंदिरातही पोहोचले आणि त्यांनी दर्शनही घेतले. पशुपतिनाथ मंदिर भेटीचा हा मोदींचा दुसरा दौरा आहे.