पोलीस हवालदारांना दिवाळीपूर्वी मिळणार ‘हे’ गिफ्ट

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यातील बारा हजार हवालदारांसाठी खुषखबर आहे. मागील पाच वर्षापासून पदोन्नतीच्या प्रतीक्षेत असलेल्या पोलीस हवालदारांना दिवाळीपूर्वी ‘प्रमोशन गिफ्ट’ देण्यात येणार आहे. पोलीस हवालदारांना पोलीस उप निरीक्षक (PSI) म्हणून पदोन्नती देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. २०१३ मध्ये पोलीस उप निरीक्षक अर्हता उत्तीर्ण झालेल्यांना पदोन्नती देण्यात येणार आहे. राज्यसरकारने १७०० पोलीस उप निरीक्षकांना सहायक पोलीस निरीक्षक (API) पदी बढती देण्याचा निर्णय मंगळवारी घेतला आहे. त्यामुळे पोलीस उप निरीक्षकांच्या रिक्त होणाऱ्या जागांवर २०१३ च्या पोलीस हवालदरांना समावून घेतले जाणार आहे.

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकारने राज्यातील कायदा व सुव्यवस्थेची घडी बसवण्यासाठी गृहमंत्रालयाने मागील दीड वर्षापासून रखडलेली सहायक पोलीस निरीक्षकांची पदोन्नती निकाली काढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे १७०० पोलीस उप निरीक्षकांना सहायक पोलीस निरीक्षक पदावर पदोन्नती मिळणार आहे. राज्यामध्ये सहायक पोलीस निरीक्षकांच्या सहा हजार जागा रिक्त आहेत. त्यामुळे ‘पीएसआय ते एपीआय’ पदोन्नतीमुळे १७०० जागा रिक्त होणार आहे. या जागांवर २०१३ मध्ये पोलीस महासंचालकांनी खात्याअंतर्गत घेतलेल्या पोलीस उपनिरीक्षक अर्हता परीक्षेत उत्तीर्ण उमेदवारांना संधी मिळणार आहे.

पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल यांनी १५ जुलैपर्य़ंत पदोन्नतीबाबत ठोस पावले उचलण्याचे निर्देश दिले होते. मात्र, अस्थापना विभागातील दप्तरदिरंगाईमुळे पदोन्नत्या रखडल्या होत्या. पोलीस महासंचालकांनी अस्थापना विभागाला धारेवर धरत आठवड्याभरात प्रमोशन यादी काढण्याचे निर्देश दिल्याने आठवड्याभरात प्रमोशन यादी निघणार आहे. त्यामुळे खात्याअंतर्गत पोलीस हवालदारांना दिवाळीपूर्वीच ‘प्रमोशन गिफ्ट’ मिळण्याची शक्यता वाढली आहे.