जावईशोध ! संविधानाचा ‘मसुदा’ एका ब्राम्हण व्यक्तीनं तयार केला, गुजरात विधानसभा अध्यक्ष तिवारींचा दावा

अहमदाबाद : वृत्तसंस्था – बी. एन. राव यांनी भारतीय संविधानाचा मसुदा तयार केला होता. ते ब्राह्मण होते असा दावा गुजरात विधानसभा अध्यक्ष राजेंद्र तिवारी यांनी केला आहे. अभिजीत बॅनर्जींसह 9 भारतीय नोबेल विजत्यांपैकी 8 ब्राह्मण होते असंही ते म्हणाले. अहमदाबादमधील ब्राह्मण संमेलनादरम्यान ते बोलत होते. यावेळी गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी हेदेखील उपस्थित होते. दरम्यान तिवारींच्या विधानामुळे नवा वाद उफाळून येण्याची शक्यता आहे.

राजेंद्र तिवारी म्हणाले, “जगातील 60 देशांच्या संविधानाचा अभ्यास केल्यानंतर भारताच्या संविधानाचा मसुदा तयार करण्यात आला होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना संविधानाचा मसुदा कोणी दिला याची माहिती तुम्हाला आहे का ? जेव्हा कधी संविधानाचा उल्लेख केला जातो तेव्हा आपण सर्व सन्मानानं डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव घेतो. परंतु त्यांच्या शब्दात मसुदा बेनेगल नरसिंह राव यांनी तयार केला आहे जे ब्राह्मण होते.” असं ते म्हणाले.

पुढे बोलताना राजेंद्र तिवारी म्हणाले, इतिहास सांगतो की, ब्राह्मण नेहमी दुसऱ्यांना पुढे करत असतो. हे बीएन राव होते ज्यांनी बाबासाहेबांना पुढे ठेवलं. आम्हाला बाबासाहेब आंबेडकर यांचा गर्व आहे की, त्यांनी 25 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान सभेच्या भाषणात ही गोष्ट मान्य केली होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं कि, ‘जे श्रेय मला दिलं जात आहे ते माझं नाही तर बीएन राव यांचं आहे’. असंही त्यांनी सांगितलं.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/