‘कोरोना’ व्हायरसपासून मुक्तीसाठी ‘गोमूत्र’ प्या अन् गाईचे शेण अंगावर लावा, हिंदू महासभेच्या अध्यक्षांचा ‘अजब’ सल्ला

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – एकीकडे जागतिक आरोग्य संघटनेने कोरोनाव्हायरसबाबत जागतिक आरोग्य आणीबाणी जाहीर केलेली असताना हिंदू महासभेचे अध्यक्ष स्वामी चक्रपाणी महाराज यांनी मात्र एक विचित्र सल्ला नागरिकांना दिला आहे. कोरोना व्हायरसपासून सुटका हवी असेल तर नागरिकांनी गोमूत्र प्यावे व गाईचे शेण सर्वांगावर फासावे, असा अजब सल्ला स्वामी चक्रपाणी महाराज यांनी दिला आहे. कोरोना व्हायरसला नष्ट करण्यासाठी हिंदू महासभा आता एका यज्ञाचे आयोजन करणार आहे, असेही ते म्हणाले.

प्रसारमाध्यमांशी बोलताना चक्रपाणी महाराज म्हणाले की एखाद्या व्यक्तीने ओम नमः शिवायचा जप केला आणि गोविष्ठा अंगाला लावली तर त्याचा कोरोना व्हायरसपासून बचाव होतो.

चीनमध्ये आतापर्यंत कोरोना व्हायरसमुळे 259 जणांचा मृत्यू झालेला असून एकूण 31 प्रांतांमध्ये 11791 जणांना कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव झालेला आहे. जागतिक आरोग्य संघटनेने जागतिक आरोग्य आणीबाणी जाहीर केलेली आहे. एका आरोग्य सर्वेक्षणाच्या निष्कर्षांमध्ये नोंदविण्यात आले आहे की चीनच्या वुहान प्रांतात एकूण 75000 जणांना कोरोना व्हायरसने बाधित केले आहे.

चीनच्या अधिकृत झिनुआने दिलेल्या वृत्तानुसार नॅशनल हेल्थ कमिशनने एकूण 1795 रुग्ण अत्यवस्थ असून सुमारे 17988 नागरिकांना या व्हायरसचा प्रादुर्भाव झालेला आहे. स्थानिक प्रशासनाने सांगितले की 243 नागरिकांना योग्य त्या उपचारांनंतर घरी सोडण्यात आले आहे.

वुहान प्रांतात अडकलेल्या 324 भारतीय नागरिकांना विमानाने भारतात आणल्यानंतर लवकरच आणखी एक विमान चीनकडे रवाना होणार आहे. चीनला नुकतीच भेट दिलेल्या परकीय नागरिकांना अमेरिकेने आपल्या देशाची दारे बंद केली आहे. कोरोना व्हायरसच्या या जागतिक उद्रेकामुळे अनेक आंतरराष्ट्रीय
वाहतूक करणार्‍या विमान कंपन्यांनी आपल्या चीनकडे जाणार्‍या सर्व फ्लाईट्स रद्द केल्या आहेत. कॅनडा, फ्रान्स, भारत, युनायटेड किंग्डम, न्यूझीलंड आणि जर्मनी या देशांनी चीनकडे जाणारी सर्व विमान उड्डाणे रद्द
केली आहेत.

दरम्यान एका जैव संशोधन करणार्‍या एका संस्थेने दावा केला आहे की कोरोना व्हायरसबाबतचे प्रभावी औषध निर्माण करण्यासाठी कोणत्याही कंपनीला 2020 च्या आधी यश येणार नाही.