धुळयातील काझीपुरा फाटयाजवळील भीषण अपघातात 3 जागीच ठार

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन – भरधाव वेगात जाणाऱ्या कंटेनरची धडक एका कारला बसली. या भीषण अपघातामध्ये कारमधील तिघांचा जागीच मृत्यू झाला तर एकजण गंभीर जखमी झाला. हा अपघात आज (रविवार) सकाळी आठच्या सुमारास काझीपुरा फाट्याजवळ झाला.

नामदेव गुलाब कोळी (वय ३६ रा. मांजरोद ता. शिरपूर), अनिल दशरथ जाधव (वय २२ रा. बाभळाज ता. शिरपूर), किशोर गजान बिऱ्हाडे (वय ३५ रा. भागपुरा ता. शिरपूर) या तिघांचा जागीच मृत्यू झाला. तर सचिन पाटील (वय-१९ रा. शिरपूर) हा गंभीर जखमी झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भरधाव वेगात जाणाऱ्या कंटेनर चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने कंटेनरची धडक कारला बसली. या धडकेत कारमधील तीन जणांचा जागीच मृत्यू झाला तर एकजण गंभीर जखमी झाला. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी तरूणाला तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर मृतदेहांचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून देण्यात आले. दुपारपर्यंत या अपघाताची नोंद करण्याचे काम सुरू होते.