दिग्गज डान्सर ‘पद्मश्री’ अस्ताद देबू यांचं 73 व्या वर्षी मुंबईत निधन !

पोलिसनामा ऑनलाइन – कथ्थक आणि कथकली यांना एकत्र करून डान्सचा नवीन फॉर्म बनवणारे प्रसिद्ध नर्तक अस्ताद देबू (Astad Deboo) यांचं निधन झालं आहे. त्यांच्या कुटुंबीयांनी माहिती दिली आहे की, गुरुवारी (दि 10 डिसेंबर) सकाळी मुंबईत त्यांचं निधन झालं आहे. ते 73 वर्षांचे होते. कुटुंबीयांच्या नुसार, गेल्या काही काळापासून अस्ताद आजारी होते. यानंतर 10 डिसेंबर रोजी सकाळी त्यांनी जगाचा निरोप घेतला.

गुजरातच्या नवसारीमध्ये 13 जुलै 1947 रोजी जन्मलेल्या अस्ताद देबू यांनी आपले गुरू प्रल्हाद दास यांच्या कडून कथ्थकचं शिक्षण घेतलं होतं. याशिवाय त्यांनी गुरू ई के पनिक्कर यांच्याकडून कथकलीचं शिक्षण घेतलं. डान्सच्या जगात तब्बल 5 दशकं काम करणाऱ्या अस्ताद देबू यांनी जगातील 70 देशात सादरीकरण केलं आहे.

फक्त डान्सचं नव्हे तर समाजसेवा क्षेत्रातही त्यांनी सतत काम केलं आहे. भारत आणि परदेशात ऐकू न येणाऱ्या मुलांची त्यांनी सेवा केली. 2002 साली अस्ताद देबू डान्स फाऊंडेशन द्वारे त्यांनी दिव्यांगांना मदत पोहोचवायला सुरुवात केली.

अस्ताद देबू यांनी बॉलिवूड डायरेक्टर मणिरत्नम, विशाल भारद्वाज अशा दिग्गजांसोबत काम केलं आहे. अस्ताद देबू यांना 1995 मध्ये सांगीत नाटक अकादमी देण्यात आला. याशिवाय 2007 साली त्यांना पद्मश्रीनं गौरवण्यात आलं आहे.