संतापजनक ! शौचालयात महात्मा गांधी, अशोक चक्राची प्रतिमा असलेल्या टाईल्स

बुलंदशहर : वृत्तसंस्था – एक संतापजनक प्रकार बुलंदशहर जिल्ह्यात उघडकीस आला आहे. स्वच्छ भारत अभियानात बांधण्यात आलेल्या शौचालयात चक्क राष्ट्रपिता महात्मा गांधी, अशोक चक्राच्या प्रतिमा असलेल्या टाईल्स बसविण्यात आल्या आहेत. या मुळे खळबळ उडाली असून संबंधित अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

उत्तर प्रदेशातील बुलंदशहर जिल्ह्यात शौचालयांमध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि राष्ट्रध्वजातील अशोक चक्राची प्रतिमा असलेल्या टाईल्स लावण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत ही शौचालये बांधण्यात आली आहेत.

बुलंदशहरमधील इच्छावरी गावात हा प्रकार घडला आहे . जिल्हा प्रशासनाने या प्रकरणी एका अधिकाऱ्याला निलंबित केले आहे. एका आठवड्यापूर्वी शौचालयांमध्ये या टाईल्स बसवण्यात आल्या होत्या. सोमवारी ही बाब ग्रामस्थांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली. इच्छावरी गावात स्वच्छ भारत अभियानांतर्गत सुमारे ५०८ शौचालये बांधण्यात आली आहेत. यांपैकी १३ शौचालयांमध्ये महात्मा गांधी आणि अशोक चक्राची प्रतिमा असलेल्या टाईल्स लावण्यात आल्याचे निदर्शनास आले.