‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर ऑक्सिजन भरण्यासह वाहतूकीची सेवा 24 तास : डॉ. राजेंद्र शिंगणे

पोलिसनामा ऑनलाईन टीम – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीतपणे होण्यासाठी मोकळ्या सिलिंडर किंवा टँकरमध्ये ऑक्सिजन भरण्याची (रिफिलिंग)आणि वाहतुकीची सुविधा 24 तास सुरू करावी, असे आदेश अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी दिले आहेत. ऑक्सिजनच्या वितरणात येणार्‍या अडचणी जाणून घेण्यासाठी उत्पादकांसोबत झालेल्या बैठकीत त्यांनी सूचना दिल्या आहेत.

राज्यात ऑक्सिजनचा साठा मुबलक असला तरी उत्पादक आणि विक्रेते यांच्याकडे वाहतूक व्यवस्था मर्यादित असून यातील 80 टक्के पुणे आणि कोकण विभागात असल्याने वितरणात अडचणी येत आहे.
मोकळ्या सिलिंडर किंवा टँकरमध्ये ऑक्सिजन भरण्याचे काम मर्यादित वेळत सध्या करण्यात येते. ते 24 तास सुरू ठेवण्यात यावे. उत्पादकांकडे असलेल्या मोठ्या टँकरचा वापरसुद्धा संबंधित विभागाकडून परवानगी घेऊन वैद्यकीय ऑक्सिजन किंवा द्रवरूप ऑक्सिजनच्या वाहतुकीसाठी करण्यात यावा.

लिंड आणि आयनॉक्स या उत्पादकांच्या नियमावलीनुसार रात्री बारा ते पाच या कालावधीत वाहतूक करण्यात येऊ नये, असे निर्देश आहेत. मात्र आपत्कालीन गरज विचारात घेऊन दोन चालकांसह वाहतूक व्यवस्था 24 तास करण्यात यावी. उत्पादकाने भाडेतत्वावर वाहन किंवा टँकर घेऊन इतर उत्पादकांकडे असलेला साठा घेऊन रिफिलिंग स्टेशन किंवा रुग्णालयात देता येईल याची व्यवस्था करण्याचे सूचित करण्यात आले आहे.